शहरासह जिल्ह्यातील मतदार संख्या ७९ लाख २३ हजारांवर

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या खास मोहिमेंतर्गत २७ हजार मतदार वाढले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ७९ लाख २३ हजारांवर पोहोचली आहे. जिल्हा निवडणूक शाखेने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर हे मतदार वाढले आहेत.

    पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेची नव्या वर्षांच्या सुरूवातीला निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. चालू महिन्यात १३ आणि १४, तसेच २७ आणि २८ नोव्हेंबर या चार दिवसांत मतदार नोंदणीसाठी खास मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत २७ हजार ४०४ मतदार वाढले आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली.

    खास मोहिमेंतर्गत १३ नोव्हेंबर रोजी ५१९०, १४ नोव्हेंबर रोजी ३४५७, २७ नोव्हेंबरला ८५८२, तर २८ नोव्हेंबरला दहा हजार १७५ नागरिकांचे मतदार नोंदणीसाठी अर्ज आले. या अर्जाची छाननी करून संबंधितांची मतदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील मतदार वाढले आहेत. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून हीच यादी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत वापरण्यात येईल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

  • जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ७९ लाख २३ हजार २९८
  • पुरुष मतदार : ४१ लाख ४५ हजार ६४३
  • महिला मतदार : ३८ लाख ७७ हजार ४१०

प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादीमध्ये नाव समाविष्ट आहे की नाही, हे तपासून पहावे. http://www.nvsp.in  या संकेतस्थळावर किंवा व्होटर्स हेल्पलाइन या उपयोजनवर (अ‍ॅप) मतदारांना आपले नाव यादीत आहे किंवा कसे, हे पाहता येईल. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

मृणालिनी सावंत, उप मुख्य निवडणूक अधिकारी