पैसा आणि दारूचा महापूर हे आता निवडणुकीचे सूत्रच झाल्याचे दिसून येते आहे. मतदारांना वाटला जाणारा पैसा व बेकायदेशीरपणे शहरात येणारी दारु पकडण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात आतापर्यंत २२ लाखांची आक्षेपार्ह रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र, दारूचा आढावा घेतला तर पुणे पोलिसांच्या हाती केवळ आठशे लिटरच बेकायदा दारू सापडल्याचे आकडेवारी सांगते. बेकायदेशीर दारूच्या बाबतीत पुणे पोलिसांची कामगिरी चांगली आहे की शहरात खरोखरच दारू येत नाही, अशी चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व बेकायदेशीर गोष्टींवर अधिक लक्ष ठेवले जाते. निवडणुकीत पैसा आणि दारू ही महत्त्वाची ठरु शकते. निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून दारू आणल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत आढळून आले आहे. प्रचारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची विदेशी देऊन खास बडदास्त ठेवली जाते. त्यासाठी उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात दारूची मागणी असते. निवडणूक काळात बेकायदेशीर दारू, पैसा या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांकडून शहरात अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आतापर्यंत २२ लाखांची रोकड मिळून आली आहे. तसेच, आतापर्यंत ८४० लिटर बेकयादेशीर दारू मिळाली आहे. त्यामुळे शहरात खरोखरच दारू येत नाही, की पोलीस व तपासणी पथकाला ती सापडत नाही, अशी चर्चा सुरू आहे.