मतदारांची वाढलेली संख्या आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध संघटना, राजकीय पक्ष, प्रशासनाकडून होणारी जनजागृती यामुळे पुणे जिल्ह्य़ात लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढली. २००९ सालच्या तुलनेत आता ही वाढ सुमारे साडेबारा टक्के होती. आता विधानसभेला मतदानाची टक्केवारी किती वाढणार याबाबत उत्सुकता आहे. ही वाढ लोकसभेप्रमाणेच राहिली तर पुणे जिल्ह्य़ाचा मतदानाचा टक्का ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त असेल.
पुणे जिल्ह्य़ात २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ४८ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी जेवढय़ा मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्या पेक्षा साडेबारा टक्के जास्त मतदारांनी २०१४ साली लोकसभेसाठी मतदान केले. मात्र, एकूण मतदारांची संख्याच जास्त असल्यामुळे लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी ५६ टक्क्य़ांच्या आसपास राहिली.
पुणे जिल्ह्य़ात २००९ साली विधानसभेसाठी सुमारे ५४ टक्के मतदान झाले होते. मतदारांमधील जागरूकता वाढल्यामुळे या वेळीसुद्धा मतदानाचा टक्का वाढेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. ही वाढ लोकसभेप्रमाणेच राहिली तर टक्केवारीची साठी ओलांडली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
टक्का वाढविण्याचे असेही प्रयत्न..
पुणे जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ११ मतदारसंघांमध्ये कमी मतदान झाले होते. या वेळी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्य़ांवर नेण्याचे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी विविध कार्यक्रम सुरू आहेत.
मतदार जागृतीसाठी व्होट एक्सप्रेस
नागरिकांना मतदानास जागृत करण्यासाठी मतदार जागृती मोहिमेअंतर्गत शुक्रवारी ‘व्होट एक्सप्रेस आणि एलसीडी व्हॅन’ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. ही व्होट एक्सप्रेस कमी मतदान झालेल्या अकरा मतदार संघांत जाऊन नागरिकांना मतदान करण्यासाठी जागृत करणार आहे. या व्हॅनसोबत असलेल्या एलईडी स्क्रीनवर नागरिकांनी मतदान करावे म्हणून माहिती दिली जाणार आहे. ही व्हॅन पुढील अकरा दिवस कॅन्टोमेन्ट, हडपसर, कसबा, शिवाजीनगर, कोथरूड, वडगावशेरी, खडकवासला, इंदापूर, बारामती, दौड, मावळ, पिंपरी असा प्रवास राहणार आहे.
व्होटर स्लिप वितरणाची विशेष मोहीम
मतदानातील टक्केवारी वाढविण्याचा महत्त्वाचा भाग असलेली व्होटर स्लिप वितरणासाठी १२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. शंभर टक्के व्होटर स्लिपचे वितरण करावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र, जे मतदार घरी भेटणार नाहीत, त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबली जाणार आहे. त्याबरोबर मतदार यादीत नाव न सापडले, केंद्रात बदल अशा तांत्रिक आडचणीमुळे मतदार वैतागून मतदान करीत नाहीत. त्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर मदतकेंद्र उभे केले जाणार आहे. या ठिकाणच्या मतदान केंद्रातील संगणकावर यादीतील नाव शोधून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मतदार केंद्र बलले असेल, तर ते सुद्धा मतदाराला सांगितले जाईल.
मोबाइलवर मिळणार मतदानाचा अलर्ट
निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सामाजिक संस्था, मोबाइल कंपन्या यांची मतदान जागृतीसाठी मदत घेतली जात आहे. मोबाइल कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याच्या जागृती मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यानुसार या मोबाइल कंपन्या मतदानाच्या अगोदर त्यांच्या सर्व ग्राहकांना मतदान करावे म्हणून संदेश पाठविणार आहेत. त्याबरोबरच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा अलर्ट देणार आहेत.