पुणे : आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी वाघाटी केली जाते. किरकोळ बाजारात वाघाटीला एक हजार ते बाराशे रुपये किलो असा उच्चांकी भाव मिळाला. महात्मा फुले मंडईत शेतकऱ्यांनी वाघाटी विक्रीस पाठविली. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.

‘आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी केली जाते. नवीन पिढीला या भाजीविषयी फारशी माहिती नाही. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाघाटी बाजारात विक्रीस पाठविली. महात्मा फुले मंडईत एकूण ३०० ते ४०० किलो वाघाटीची आवक झाली,’ अशी माहिती महात्मा फुले मंडईतील भाजीपाला व्यापारी रवींद्र खांदवे यांनी दिली.

‘आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी आणि भाकरी असा बेत करतात. वाघाटीची भाजी खाऊन उपवास सोडण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही आहे. दर वर्षी आषाढी एकादशीला ग्रामीण भागातील शेतकरी न चुकता बाजारात वाघाटी महात्मा फुले मंडईत विक्रीस पाठवितात. वाघाटी ठरावीक भाजीपाला विक्रेत्यांकडे मिळते.’

‘सह्याद्रीच्या डोंगररांगांत वाघाटीची काटेरी झाडे असतात. शेतकरी काटेरी जाळीत असलेली वाघाटीची फळे तोडतात. वाघाटी आणि करटूल या दोन भाज्यांमध्ये फरक आहे. वाघाटाची फळे बेलफळाप्रमाणे असतात. आकाराने वाघाटीची फळे मध्यम असतात. करटूल काटेरी असते,’ असे खांदवे यांनी नमूद केले.

पावसाळा सुरू झाल्यानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांत रानभाज्या नैसर्गिकरीत्या येतात. वाघाटी ही रानभाजी आहे. आषाढीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी वाघाटीची भाजी केली जाते. जुन्या पिढीतील अनेकांकडून या भाजीला मागणी असते. नवीन पिढीला या भाजीविषयी फारशी माहीत नाही. – रवींद्र खांदवे, भाजीपाला व्यापारी, महात्मा फुले मंडई