पिंपरी : वाकड येथील दहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराची घटना माणुसकीला कलंक लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी केली.
वाकड परिसरात जीवे मारण्याची धमकी देऊन दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील पिडीत मुलीच्या कुटुंबियांची आठवले यांनी मंगळवारी भेट घेतली. पोलिसांकडूनही तपासाची माहिती घेतली. नगरसेवक राहुल कलाटे, कुणाल वाव्हवळकर यावेळी उपस्थित होते. ‘वाकडमधील घटनेतून माणूस कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, हे दिसून आले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यादृष्टीने आरोपपत्र दाखल केले जावे. चार ते पाच महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणाचा चांगल्या पद्धतीने तपास केला आहे’, असे आठवले म्हणाले.
‘सामाजिक न्याय खात्यातून या घटनेतील पिडीतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल. पक्षाच्या वतीनेही मदत केली आहे. गरीब, मजुरी करणारे कुटुंब आहे. अशा पद्धतीचे अत्याचार होऊ नये यासाठी समाजाने पुढे येण्याची आवश्यकता आहे. कायदे अनेक होतात. पण त्याची अंमलबाजवणी होत नाही’, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.
एसआटीमार्फत तपास
वाकड येथील दहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या पथकात पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या विशेष तपास पथकाच्या माध्यमातून गुन्ह्यातील सर्व पुरावे, साक्षी आणि तांत्रिक बाबींची सखोल पडताळणी करून तपास शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कालावधीत एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
कसा आला प्रकार उघडकीस
रमजान बन्नूसाब बागवान (वय ६५, रा. ताथवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बागवान हा गवंडी काम करतो. फिर्यादीच्या दहा वर्षीय मुलीला चाकूने पोट चिरेल, अशी धमकी देऊन घरात कोणी नसताना तोंड दाबून आरोपीने स्वतःच्या घरात नेले. त्यानंतर मे ते २७ जुलै २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, फिर्यादीच्या चार वर्षीय मुलीला देखील त्याच कालावधीत एका प्रसंगी तोंड दाबून आरोपीने स्वतःच्या घरात नेल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या मुलीला आरोपी घेऊन जात असताना एका महिलेच्या निदर्शनास आले. संबंधित महिलेने याबाबत फिर्यादीला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी महिलेने वाकड पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली.
