पिंपरी : वर्तणूक चांगली नसल्याच्या कारणावरून वाहतूक पोलीस मदतीनस (ट्रॅफिक वॉर्डन) म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने वाहतूक पोलिसांनी डिटेन केलेली दुचाकी चोरी केली. चोरलेल्या दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी ट्रॅफिक वॉर्डन अटक केली आहे.

सचिन मानसिंग चव्हाण (वय २७, बोडके वस्ती, माण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. आठ एप्रिल रोजी सकाळी थेरगाव मधील गणेश मंदिर येथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकड पोलिसांच्या पथकाने परिसरात सुमारे १५० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित केला आणि संशयित आरोपी सचिन चव्हाण याला माण येथून ताब्यात घेतले.

सचिन चव्हाण याने थेरगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे कबुल केले. तसेच त्याने वाकड येथे आणखी एक चोरीचा गुन्हा केला होता. चतुःशृंगी येथे एक वाहन चोरीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. पोलिसांनी सचिनकडून दोन दुचाकी, २३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी सचिन चव्हाण हा यापूर्वी चतुःशृंगी वाहतूक विभागात ट्राफिक वॉर्डन म्हणून काम करत होता. त्याची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला पाच महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आरोपीने मार्च २०२६ दरम्यान वाहतूक विभागाजवळ डिटेन करून ठेवलेल्या दुचाकींमधील एक मोपेड दुचाकी चोरली. त्या दुचाकीचा वापर त्याने थेरगाव येथील चोरीसाठी केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलीस निरीक्षक किशोर पाटील, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, सहायक उपनिरीक्षक संदीप गवारी, कॉन्स्टेबल वंदू गिरे, तात्यासाहेब शिंदे, कौंतेय खराडे, विक्रम भगत आणि पथकाने केली.