पिंपरी : वाकड येथे मोटारचालकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे घेऊन पलायन करणाऱ्या चोराला वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.अरबाज ऊर्फ लाला इरफान शेख ( वय २३, रा.कोंढवा बुद्रुक, पुणे) याला अटक झाली. त्याचा साथीदार राजू ऊर्फ सत्यम वीरबहादूर सिंह (वय २४, रा. घोरपडे पेठ, पुणे) याचा शोध घेऊन त्यालाही अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश महादेव जाधव (वय ३४, रा. काळेवाडी) मंगळवारी पहाटे वाकड पोलीस ठाण्यात आले. ते वाकड येथे प्रवासी घेण्यासाठी थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ३१०० रुपये जबरदस्तीने चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी जाधव यांच्या मोटारीमधून आरोपींचा शोध सुरू केला. दत्त मंदिर रोड येथे आरोपी दिसले. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले.

काळा खडक येथे आल्यानंतर आरोपींच्या दुचाकीला मोटार आडवी लावून त्यांना थांबविण्यात ले. त्यानंतरदेखील आरोपी पळून जात असताना इम्रान सय्यद यांनी पाठलाग करून अरबाजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त केला. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. मात्र, अवघ्या काही तासांत त्यालादेखील वाकड पोलिसांनी अटक केली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांचा सत्कार केला. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड या वेळी उपस्थित होते.