पिंपरी : सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वाकडमध्ये महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह चौघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा सचिन गवारे (४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती सचिन गवारे, सासरे उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी आणि दीर संदीप (सर्व रा. वाकड) यांना अटक करण्यात आली. महिलेचा भाऊ संतोष गुलाब कलाटे (४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिल्पा यांचा २००९ मध्ये विवाह झाला. त्यांच्या पतीविरुद्ध एका खून प्रकरणात खटला सुरू असल्याचे सासरच्या लोकांनी लपवून ठेवले होते. लग्नानंतर पतीला त्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. तो चार वर्षे कारागृहात होता. सासरच्या मंडळींनी महिलेकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि तिच्या वडिलांच्या जमिनीच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी तगादा लावला. पतीला मद्याचे व्यसन होते, तर सासू संशय घेत होती.
सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करून माहेरच्या लोकांनी त्यांना रोख रक्कम दिली, तसेच व्यवसायात आणि जमीन खरेदीतही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिल्पा यांनी मालमत्तेच्या कागदपत्रांवर भावांना स्वाक्षरी दिल्याचे समजताच सासरच्यांनी तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. गुरुवारी पहाटे एकच्या सुमारास शिल्पा यांनी शयनगृहातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले.
