आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीनुसार शहरातील सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या सहा प्रभागात महिलांची मतदार निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणूक शाखेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे.

निवडणुकीसाठी ५८ प्रभाग असून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. धायरी-आंबेगाव आणि मगरपट्टा-साधना विद्यालय प्रभाग वगळता अन्य प्रभागातील मतदारांची संख्या किमान पन्नास हजारांपासून कमाल ८३ हजार या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.यामध्ये सहा मतदार संघात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. गोखलेनगर-वडारवाडी (प्रभाग क्रमांक-१५), फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणा (प्रभाग क्रमांक १६), शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक १७), शनिवारवाडा-कसबा पेठ (प्रभाग क्रमांक १८), छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक १९) आणि घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई (प्रभाग क्रमांक २९) या सहा प्रभागात महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रभाग शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत.

आगामी महापालिका निवडणूक सन २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. निवडणुकीसाठी ३४ लाख ५८ हजार ७१४ मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये १८ लाख ७ हजार ६६३ पुरुष मतदार तर १६ लाख ५० हजार ८०७ स्त्री मतदार आहेत. अन्य मतदारांची संख्या २४४ एवढी प्रारूप मतदार यादीत दर्शविण्यात आली आहे. सन २०१७ च्या तुलनेत मतदारांच्या संख्येत ८ लाख २३ हजार ९१६ एवढी वाढ झाली आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १ जुलैपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येणार आहेत. त्यानंतर ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक शाखेत हरकती-सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.