पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उभारलेल्या विशेष आरोग्य व्यवस्थेचा तीन दिवसांत ५३ हजार ८१३ वारकऱ्यांनी लाभ घेतला. पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, फिजिओथेरपी आणि विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
वारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची प्रसूतिगृहे, दवाखाने, आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे वारकऱ्यांसाठी मोफत केस पेपर व औषधांची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी, तसेच स्वागत कक्षांमध्ये विशेष आरोग्य बूथ उभारून वारकऱ्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.
वारकऱ्यांचे वजन, उंची आणि रक्तदाबाची नोंद घेण्यात आली. तसेच रक्त, थुंकी (क्षयरोग), मलेरिया आणि मधुमेह तपासणीसह विविध चाचण्या करण्यात आल्या. उपचारांची गरज असलेल्या २१ वारकऱ्यांना रुग्णवाहिकेद्वारे कमला नेहरू रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.या काळात १ हजार २२४ वारकऱ्यांनी फिजिओथेरपी सेवेचा लाभ घेतला.
पालखी मुक्कामस्थळी २५० प्रथमोपचार मेडिकल किटचे वितरण करण्यात आले, तर महिला वारकऱ्यांना १० हजार सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. पालखी मार्गावरील ३५ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. भवानी पेठ आणि नाना पेठ येथील मुक्कामस्थळी २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होती.
पुणे ते पंढरपूर या संपूर्ण प्रवासादरम्यान महापालिकेची चार स्वतंत्र वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका वारकऱ्यांसमवेत कार्यरत राहणार आहेत. या पथकात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. डॉ. नीना बोराडे आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
