पुणे : महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा आणि एकविसाव्या शतकातील प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा अभूतपूर्व संगम असलेल्या ‘छोटा वारकरी’ हा उपक्रम सध्या तंत्रज्ञान विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी पुण्याच्या वारीव्हर्स स्टुडिओज या स्टार्टअपने ‘मास्टर्स युनियन नेक्स्ट टेक १.० एआय शिखर परिषद’ मध्ये मानाचा ‘क्रिएटिव्ह ल्यूमिनरी ॲवाॅर्ड पटकावला आहे. वारीव्हर्स स्टुडिओजचे संस्थापक स्वप्नील मोरे आणि सह-संस्थापक पूजा मोरे यांना या जागतिक स्तरावरील व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले.
या स्टार्टअपच्या ‘छोटा वारकरी’ या उपक्रमाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. शतकानुशतके चालत आलेली अभंगवाणी, संतांचे विचार आणि वारकरी संस्कार नव्या पिढीला समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यासाठी मोरे यांनी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘छोटा वारकरी’ या अभिनव ॲनिमेशन व्यक्तिरेखेचे उद्घाटन नुकतेच झाले होते.
या यशाबद्दल बोलताना स्वप्नील मोरे म्हणाले, ‘हा सन्मान केवळ आमचा नसून संपूर्ण वारकरी परंपरेचा आहे. ‘याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन’ या उक्तीप्रमाणे आपली संस्कृती जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एआय हे केवळ साधन नसून ते भविष्यातील संवादाचे सशक्त माध्यम आहे.’
पूजा मोरे म्हणाल्या, ‘छोटा वारकरी हा आमच्यासाठी केवळ एक प्रकल्प नाही. तर, तो एक भावनिक प्रवास आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या वारीव्हर्स स्टुडिओजला भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत मान्यता मिळाली आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा वापर हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या पुरस्कारामुळे केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा डंका जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात वाजला आहे. पारंपारिक भक्ती मार्ग आता डिजिटल युगात ‘स्मार्ट’ पद्धतीने प्रवाहित होत आहे, हेच या यशाने सिद्ध केले आहे.
काय आहे ‘छोटा वारकरी’ संकल्पना?
गेल्या १५ वर्षांपासून ‘फेसबुक दिंडी’ आणि ‘व्हर्च्युअल दिंडी’च्या माध्यमातून वारीचा प्रचार करणारे स्वप्नील मोरे यांनी या संकल्पनेची निर्मिती केली आहे. युवा पिढीला आपल्या मुळांशी जोडण्यासाठी ‘छोटा वारकरी’ या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. एआय आधारित कथाकथन, अॅनिमेशन आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांवर आध्यात्मिक व नैतिक संस्कार करण्याचे कार्य हे स्टार्टअप करत आहे. केवळ मनोरंजन नाही, तर मूल्यांची जोपासना हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
