पुणे : वारजे भागातील टेकडीवर झालेल्या तरुणाचा खुनाचा छडा गुन्हे शाखेने लावला. आर्थिक व्यवहारातून मित्राचा खून करुन पसार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली.

राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (वय ४०, रा. स्वराज आर्केड, आंबेगाव, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शुभम राजेश शिंदे (वय २५, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, नांदेड सिटी, सिंहगड रस्ता), लकी सुरेंद्र सिंग (वय २३, रा. खडकी), सुनील संतोष खलसे ऊर्फ एस. के. (वय १९, रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक करण्यात आली. खून प्रकरणात एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

वारजे भागातील आकाशनगर येथील वन विभागाच्या टेकडीवरील तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी (२३ जानेवारी) सापडला होता. तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आला होता, तसेच दगडाने चेहरा ठेचण्यात आला होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. वारजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत होता. सहायक फौजदार बाळू गायकवाड, पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना खून प्रकरणातील संशयितांची माहिती मिळाली. संशयित आरोपी वारजे भागातील गणपती माथा परिसरात थांबल्याची महिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला १८ लाख रुपये दिले होते. पैसे वसूली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने त्यांच्याकडून ११ लाख रुपये घेतले होते. पैसे वसूल न केल्याने ऐलगच्चे यांनी शिंदे याच्याकडे पैसे परत मागतले होते. त्यानंतर शिंदे याने साथीदारांशी संगनमत करुन ऐलगच्चे यांचा खून करण्याचा कट रचला. ऐलगच्चे यांना वारजे येथील शनी मंदिर टेकडी येथे २१ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बोलविले. ऐलगच्चे तेथे आले. आरोपी शिंदे आणि साथीदारांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तसेच ओळख पटू नये म्हणून त्यांच्या डोक्यात दगड घातला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे आणि पथकाने ही कारवाई केली.

वाईतून बेपत्ता असलेल्या तरुणाची लाॅजमध्ये आत्महत्या

आठवडाभरापूर्वी वाईतून बेपत्ता झालेल्या एका तरुणाने लष्कर भागातील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

पियूष ओसवाल (वय २७, रा. वाई, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियूष हा आठवडाभरापासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. लष्कर भागातील एका लाॅजमध्ये पियुष राहत होता. बुधवारी (२१ जानेवारी) दुपारी लाॅजमधील कर्मचाऱ्यांनी खोलीतून तीव्र वास येत असून, दरवाजा उघडत नसल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर खोलीत पियूष याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्याने एक ते दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

‘पियूष हा बेपत्ता असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पियूषचे वडील सराफ व्यावसायिक आहेत. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.