येरवडा मनोरुग्णालयातील रुग्णांची सुरक्षितता आणि मनोरुग्णालयातील एकूणच स्वच्छता या प्रमुख मुद्दय़ांवरून आरोग्य उपसंचालक कार्यालयापाठोपाठ आरोग्य संचालकांनीही रुग्णालय अधीक्षकांना सुधारणेचा इशारा दिला आहे. मनोरुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा घडवण्यासाठी आरोग्य संचालकांनी एक महिन्याची मुदत दिली आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या आठवडय़ात आरोग्य संचालक कार्यालयाकडून मनोरुग्णालयास पत्र गेले असून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी मनोरुग्णालय अधीक्षकांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मनोरुग्णालयात रात्रपाळीसाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, रात्रीच्या वेळेस या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात वेळोवेळी फिरून तपासणी करावी, वॉर्डात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथील कामकाजाच्या नोंदी ठेवाव्यात, वैद्यकीय नोंदी कोणतीही त्रुटी राहू न देता ठेवल्या जाव्यात, या मुद्दय़ांचा या पत्रात समावेश करण्यात आला आहे. मनोरुग्णालयाचा परिसर, स्वच्छतागृहे, मनोरुग्णांचे कपडे इ. स्वच्छ राहावेत याची काळजी घेण्याच्या मुद्दय़ावरही भर देण्यात आला आहे.’’
यापूर्वी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने मनोरुग्णालयासंबंधी दिलेल्या अहवालात याच सुधारणांचा उल्लेख करण्यात आला होता. यासंबंधी मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांच्याशी संपर्क साधला असता मात्र त्यांनी आरोग्य संचालक कार्यालयाकडून असे पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘यापूर्वी आरोग्य संचालक व उपसंचालक कार्यालयाने सुचवलेल्या सुधारणांसंबंधी मनोरुग्णालयातर्फे अहवाल सादर करण्यात आले असून अपेक्षित सुधारणा प्रक्रियाधीन आहेत. मनोरुग्णालयात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंबंधी ई- टेंडरिंगची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.’’

ई- टेंडरिंगला अत्यल्प प्रतिसाद
मनोरुग्णालयातील स्वच्छतेचे कंत्राट देण्यासाठी आरोग्य संचालक स्तरावर ई- टेंडरिंगची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला असलेला प्रतिसाद मात्र अगदीच कमी असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले. टेंडर भरण्यास फार कुणी पुढे येत नसल्याने टेंडर भरण्यासाठीची मुदतही ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आली होती.