राज्यात वटपौर्णिमा साजरी होत असतानाच पुणे आणि पिंपरीत बुधवारी साखळीचोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या दागिन्यांवर साखळीचोरांनी डल्ला मारला असून बुधवारी शहरात बाईकवरुन आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र आणि दागिने चोरल्याच्या १२ घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्रात आज वटपौर्णिमेचा उत्साह आहे. नवीन साडी आणि दागिने घालून महिला घराबाहेर पडल्या आहेत. पुणे आणि पिंपरीतही बुधवारी असेच चित्र होते. मात्र, याचा गैरफायदा सोनसाखळी चोरांनी घेतला. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे सौदागर तर पुण्यात शिवाजीनगर आणि कोंढाव्यात या ठिकाणी सोन साखळी चोरांनी थैमान घातले आहे. दुचाकी वरून आलेल्या दोघांनी सांगवी परिसरात सोन साखळी हिसकावल्या आहेत. याचा तपास सांगवी पोलीस,वाकड पोलीस करत आहेत.

महिलांनी संशयास्पद व्यक्ति फिरताना दिसल्यास तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी दिले आहे. या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडल्या आहेत. मात्र, या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.