scorecardresearch

पुणे : पुण्यात पाणीकपात, पण आठ दिवसांसाठी

शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Water Supplay Stop
(संग्रहीत छायाचित्र)

शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (४ जुलै) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून सोमवारपासून पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलै पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या कालावधीत पडणारा पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पाणी वितरण व्यवस्थेचे पुढील नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

सध्या सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच मात्र एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. ११जुलै पर्यंतच्या दिवासाआड पाणीपुरवठ्याचे हे वेळापत्रक असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे जवळपास निश्चित झाले होते. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. धरणात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेला घ्यावाच लागणार होता. मात्र त्याबाबत आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लांबणीवर पडत होती. आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेतला. त्या वेळी पाणीकपात करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्याचे निश्चित करण्यात आले.

शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असला तरी एकूण पाणी वापरात साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाईल. सध्या रोजचा पाण्याचा वापर १ हजार ६५० दशलक्ष लिटर एवढा आहे. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी १ हजार २०० दशलक्ष लिटर पाणी वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ४५० दशलक्ष लिटर पाणी कमी घेण्यात येणार असल्याने काही भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे.

उशिरा निर्णय तो ही ठराविक कालावधीसाठीच
धरणातील पाण्याने तळ गाठल्याने पाणकपातीचा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र पाऊस पडेल, या अपेक्षेने पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. जलसंपदा विभागाकडून त्यासंदर्भात महापालिकेला वेळोवेळी इशारा देण्यात आला होता. पंधरा जुलैपर्यंतच पुरेल एवढे पाणी धरणात राहिल्याने सोमवारपासून (४ जुलै) दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र पुढील आठ दिवसांत पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने पाणीकपातीचा निर्णय ठराविक कालावधीपुरताच घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water cut in pune for eight days pune print news amy