पुण्यात गणपती विसर्जनासाठी खडकवासल्यातून नदीत पाणी सोडणार

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरुवात

khadakwasla dam
खडकवासला धरणाचे संग्रहित छायाचित्र

पुण्यातील गणेश विसर्जनासाठी मुठा नदीमध्ये खडकवासला धरणातून २००० क्सुसेक वेगाने गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढून गणेशभक्तांना वाहत्या पाण्यात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करता येईल. दरम्यान, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन हे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही हौदातच करण्यात येणार आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी विसर्जनाने होईल. पुणे शहर आणि उपनगरातील हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन मुठा नदीवरील विविध घाटांवर तसेच महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदांमध्ये करण्यात येईल. यासाठीची सर्व तयारी पुणे महापालिकेने पूर्ण केली आहे. गुरुवारी पहाटेपासूनच खडकवासला धरणातून २००० क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येईल. विविध घाटांवर विसर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षेच्या कारणास्तवर जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी दहा वाजता मंडईमधील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पाचही गणपतींची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने निघणार असून, दुपारनंतर या गणपतींचे वेगवेगळ्या घाटांवर महापालिकेने खास तयार केलेल्या हौदांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात येईल.
यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे धरणातून विसर्जनासाठी २००० क्सुसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water discharge from khadakwasla dam for ganpati visarjan