पाणीगळतीचे प्रमाण ४० टक्के!

शहराच्या भौगोलिक रचनेमुळे पाणी वितरणामध्ये अनेक त्रुटी आहेत.

समान पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान; प्रशासनाला गळती रोखण्यात अपयश

शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी पाणीगळती हा पाणीपुरवठय़ातील प्रमुख अडथळा ठरला आहे. शहरातील सातशे किलोमीटर लांबीच्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांमुळे मिळणाऱ्या पाण्यातील सात टक्के पाणी रोज वाया जात असून एकूण गळतीचा विचार केल्यास शहरात गळतीचे प्रमाण चाळीस टक्के एवढे आहे. ही गळती थांबवल्याशिवाय शहराच्या सर्व भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करता येणे शक्य नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर समान पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करणे हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षापुढील आव्हान राहणार आहे.

शहराच्या भौगोलिक रचनेमुळे पाणी वितरणामध्ये अनेक त्रुटी आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. कित्येक वर्षांपूर्वी टाकलेल्या या जलवाहिन्यांचे नकाशेही महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. शहरात मोठय़ा प्रमाणावर पाणीगळती होत असल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातूनही वेळोवेळी पुढे आली आहे. त्यामुळे या जुन्या जलवाहिन्यातून होणाऱ्या गळतीवर नियंत्रण कसे ठेवायचे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आणि मानकांनुसार दरडोई दररोज १३५ लीटर पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात दरडोई रोज तीनशे लीटरहून अधिक पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावाही काही संस्थांकडून केला जातो. धरणातून महापालिका किती पाणी उचलते, याबाबत पाटबंधारे आणि जलसंपदा विभागातील अधिकारी तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून परस्पर दावे केले जातात. सध्या शहराला जुन्या करारानुसार पाणीपुरवठा होत असून चोवीस लाख लोकसंख्या गृहीत धरून वार्षिक साडेअकरा टीएमसी एवढा पाणीपुरवठा जलसंपदा विभागाकडून करण्यात येतो. मात्र पाण्याचे मोजमाप करण्याची यंत्रणा दोन्ही संस्थांकडे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात किती पाणी उचलण्यात आले, त्याचे किती वितरण झाले याचे नेमकी माहिती पुढे येत येत नाही. पाणीगळतीमुळेच पुरेसा पाणीपुरवठा मिळविण्यात अडथळे येत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. या पाश्र्वभूमीवर समान पाणीपुरवठा योजना (२४ बाय ७) ही योजना पुरेशा पाणीपुरवठय़ासाठी उपयुक्त ठरणार आहे.

शहरातील एकूण पाणीगळतीचे प्रमाण चाळीस टक्क्य़ांपर्यंत आहे. प्रशासकीय पातळीवरही त्याला दुजोरा देण्यात येतो. समान पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठय़ासंदर्भात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. शहरात एकूण २ दोन हजार ५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आहेत. त्यापैकी सातशे ते आठशे किलोमीटर लांबीच्या वाहिन्या या तीस ते पस्तीस वर्षे जुन्या आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठ, कसबा, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, खडकमाळ आळी, रविवार पेठ, शनिवार पेठ, मंडई, गुरुवार पेठ, रास्ता पेठ, शिवाजी नगर येथील पाणीपुरवठय़ाच्या वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. सध्या शिवाजीनगर गावठाण, कोथरूड आणि सेनापती बापट रस्ता परिसरात पाणीपुरवठय़ासंदर्भात सातत्याने काही अडथळे येत आहेत. या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही आता नियंत्रणाबाहेर गेले आहे. त्यामुळे या जलवाहिन्या बदलणे हाच त्यावरील एकमेव उपाय ठरणार असून समान पाणीपुरवठा योजना त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

समान पाणीपुरवठा योजना अशी..

शहराची २०४७ सालापर्यंतची लोकसंख्या आणि त्यादृष्टीने पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन समान पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठीचा बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना दोन हजार ८१८ कोटींची असून पुढील पाच वर्षांत ती कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध ठिकाणी ८२ साठवणूक टाक्यांची उभारणी प्रस्तावित आहे. काही ठिकाणी नव्याने टाक्यांची उभारणी होणार आहे. याशिवाय शहराला शंभर टक्के मीटर पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शहरामध्ये १ हजार ७०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी नव्याने टाकण्यात येणार आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी एक हजार ७१८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

३०२ कोटींची तरतूद

शहराची भौगोलिक रचना, वितरणातील त्रुटी, असमान पाणीपुरवठा या पाश्र्वभूमीवर आखण्यात आलेली ही योजना सध्या राजकीय वादात सापडली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पाणीपुरवठय़ासंदर्भात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ठोस तरतूद केली असली आणि कुंडलिका-वरसगांव ही योजना प्रस्तावित केली असली, तरी समान पाणीपुरवठा योजना शहराच्या पाणीपुरवठा वितरणाचा चेहरा-मोहरा बदलणारी ठरणार आहे. स्थायी समितीने या योजनेसाठी अंदाजपत्रकामध्ये ३०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र तरतुदीपेक्षाही किती जलदगतीने ही योजना राबविणार यावरच शहराच्या पाणीपुरवठय़ाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभेनेही ही योजना राबविण्यास मान्यता दिली असून कर्जरोखे काढून ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे.

समान पाणीपुरवठा योजना ही शहरासाठी महत्त्वाची योजना ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. अंदाजपत्रकातही त्यासाठी तरतूद करण्यात आली असून आर्थिक अडचणी येणार नाहीत, याबाबत आम्ही दक्षता घेऊ.

मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water leakage issue in pune

ताज्या बातम्या