पुणे व परिसरात या वर्षी पावसाची अभूतपूर्व स्थिती उद्भवली आहे. जून, जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही पावसाची तूट पाहायला मिळाली आहे. या हंगामात आतापर्यंत तब्बल सव्वाशे मिलिमीटरची तूट पाहायला मिळाली आहे. येत्या काही दिवसांतही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याने आता सप्टेंबर महिन्यातील पावसावरच भिस्त राहणार आहे.
पुण्यात या वर्षी पावसाची उघडीप सर्वाधिक काळासाठी म्हणजे सलग दोन महिन्यांहून अधिक काळासाठी अनुभवायला मिळाली आहे. त्यामुळे आताच्या पावसाळ्यात सर्वच्या सर्व म्हणजे तीनही महिन्यांमध्ये ती कायम आहे. पुण्यात १ जून ते २० ऑगस्ट या काळात सरासरी ४०५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होते. या वेळी केवळ २८७ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे सुमारे ११८ मिलिमीटरची तूट निर्माण झाली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या आठ-दहा दिवसांत विशेष पावसाची शक्यता नाही. पाऊस पडला, तरी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तोसुद्धा काही भागात पडेल, तर काही भाग त्याच्यापासून वंचितच राहील. अशा स्थितीत ऑगस्ट अखेपर्यंत पावसाची तूट भरून निघण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळेच आता सारी भिस्त सप्टेंबर महिन्यातील पावसावरच ठेवावी लागणार आहे.
पुण्याप्रमाणेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील पावसाची स्थिती आहे. पुण्यात तीनचार दिवसांचा चांगला पाऊस पडला, तर सव्वाशे मिलिमीटरची तूट भरून निघणे कठीण नाही. मात्र, तसे होण्यास बंगालच्या उपसागरात हवामानाची अनुकूल स्थिती निर्माण व्हावी लागेल. तशी स्थिती या वर्षी निर्माण होत नाही, हीच समस्या या वेळी भेडसावत आहे. पावसावर विपरीत परिणाम करणारा ‘एन-निनो’ हा घटक सध्या सक्रिय असल्याने हा अनुभव येत आहे, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
सुरुवातीला तूट, उत्तरार्धात पाऊस
पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे एक वैशिष्टय़ पाहायला मिळाले आहे. त्यानुसार सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असते, तर पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार पाऊस पडून ही तूट भरून निघते. २०१२ आणि २०१४ या वर्षांत पुण्यात पावसाचे पहिले दोन महिने तुटीचे होते. त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुढच्या दोन महिन्यांमध्ये ही तूट भरून निघाली होती.