पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा चार दिवसांवर आला असताना आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषण, रसायनमिश्रीत पाण्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग पाच दिवसांपासून नदीतील पाण्यावर तवंग येत आहेत. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. वारक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहर पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pollution in indrayani river at alandi pune print news ggy 03 amy
First published on: 25-06-2024 at 20:09 IST