सर्वाधिक तक्रारी पाण्यावरून ; तत्काळ कारवाईचे आयुक्तांचे आदेश

पिंपरी: पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेच्या माध्यमातून शहरवासियांच्या तक्रारींचा पुन्हा एकदा ‘पाऊस’ पडला. पाणीपुरवठा याच विषयावरून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी, प्रत्येक भागातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्याबरोबरच पाणीविषयक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय कालावधीत नागरिकांना तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ म्हणून आयुक्तांनी जनसंवाद सभेचा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्यावरून पालिकेकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा आणि योग्यप्रकारे पाण्याचे नियोजन करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले. रस्त्यांवरील विक्रेत्यांचे योग्य जागेवर स्थलांतर करण्यासाठी प्रभाग स्तरावर अंमलबजावणी करण्यासही आयुक्तांनी सांगितले आहे.
दरम्यान, सोमवारी (२७ जून) सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा झाल्या. सोयीच्या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र उभारावेत. स्वच्छ व उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. करभरणा प्रणाली सोपी करून ऑनलाईन करभरणा करण्यासाठी सुलभ यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अपूर्ण रस्ता असलेल्या ठिकाणी डांबरीकरणाची कामे जलदगतीने करावीत. तुटलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांची लवकर दुरुस्ती करावी. मलनिस्सारण वाहिन्यांसाठी खोदलेले खड्डे त्वरित बुजवावेत. रस्त्यावरील राडारोडा तात्काळ हटवण्यात यावा. राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. अनधिकृत बांधकामांवर पाडकाम कारवाई करावी. महापालिकेने केलेल्या कारवाईत संबंधित जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतनाशक फवारणी करावी. अनधिकृत नळजोड देऊ नयेत अशा सूचना तसेच तक्रारी नागरिकांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून मांडल्या. यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांना केल्या आहेत.