पुणे : सध्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असूनही महानगरपालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाणी घेण्याच्या ठिकाणाचे (पंप हाऊस) नियंत्रण महापालिकेकडून काढून जलसंपदा विभागाकडे देण्याचा आग्रह धरला आहे. पुणे पाटबंधारे मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंता यांनी याबाबतचा अहवाल तयार करून मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला आहे. या अहवालाच्या आधारे राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून अखेर शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने यंदा एक सिंचन आवर्तन जास्त घेतल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे. यासह गेल्या वर्षी न झालेला परतीचा पाऊस, कडक उन्हाळा आणि त्यामुळे धरणांमधील पाण्याचे झालेले बाष्पीभवन, पाणीचोरी व गळती आणि पाण्याची अतिरिक्त मागणी अशा विविध कारणांनी यंदा धरणांनी तळ गाठला होता. या परिस्थितीतही महानगरपालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणीवापर करण्यात येत आहे. याबाबत पुणे पाटबंधारे मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता रा. वि. सावंत यांनी मुख्य अभियंता हणुमंत गुणाले यांना याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये महापालिकेकडून पाणीवापर जास्त होत असल्याने खडकवासला धरणातून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाचे नियंत्रण महापालिकडून काढून जलसंपदा विभागाकडे देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पाण्याच्या २०२१-२२ च्या वार्षिक अंदाजपत्रकात पुणे महापाालिकेने दिलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार महापालिकेला १०.९० टीएमसी पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेने प्रत्यक्ष पाणीवापर २०.२४ टीएमसी केला आहे. महापालिकेच्या जादा पाणीवापरामुळे उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी अपुरे पडते; तसेच पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

अहवालात काय?

खडकवासला धरणातून पुण्याला होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी पंप हाऊस बांधण्यात आले आहे. पंप हाऊस महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याची नोंद या ठिकाणी मीटरद्वारे होते. पंप हाऊस आणि धरणातून पाणी घेण्याची ठिकाणे यांचे नियंत्रण महापालिकेऐवजी जलसंपदा विभागाकडे देण्याचे सावंत यांनी अहवालात स्पष्ट केले आहे. महापालिकेचा पाणीवापर हा ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) या मर्यादेत करण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (महाराष्ट्र वॉटर रिर्सोसेस रेग्युलेटरी ॲथॉरिटी – एमडब्ल्यूआरआरए) दिले आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार २७ ऑगस्ट २०२० रोजी भामा आसखेड धरणातून २.६७ टीएमसी वाढीव पाणी आरक्षण मंजूर झाले असून डिसेंबर २०२० पासून महापालिकेने या धरणातून पाणीवापर सुरू केला आहे. भामा आसखेड धरणातील पाणीवापर सुरू झाल्यानंतर खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर कमी करणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेने प्रत्यक्ष पाणीवापर नियंत्रित किंवा कमी केलेला नाही, असेही अहवालात स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water resources department wants control municipal pump house dams corporation pune print news ysh
First published on: 07-07-2022 at 20:20 IST