scorecardresearch

धरणांमधील पाणीसाठा दीड टीएमसीने कमी; कडक उन्हाळय़ाचा परिणाम

कडक उन्हाळय़ामुळे होत असलेले बाष्पीभवन, पाण्याची वाढती मागणी, पाणीगळती आणि चोरी अशा विविध कारणांमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे.

पुणे : कडक उन्हाळय़ामुळे होत असलेले बाष्पीभवन, पाण्याची वाढती मागणी, पाणीगळती आणि चोरी अशा विविध कारणांमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून १३.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सध्या ४४ टक्के पाणीसाठा आहे. शहर आणि ग्रामीण भागासाठी उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत चारही धरणांत १५ टीएमसीपर्यंत पाणीसाठा होता. सद्य:स्थिती पाहता पावसाळय़ापर्यंत शहर आणि ग्रामीण भागाला पुरेसे पाणी देण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठाही कमी होत आहे. मात्र, पावसाळय़ापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्याएवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याचेही जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये १ मार्च रोजी १७.७५ टीएमसी पाणी उपलब्ध होते. त्यापैकी ७.०६ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यत राखीव ठेवण्यात आले आहे. दौंड नगरपालिकेसह ग्रामीण भागात पिण्यासाठी ०.६० टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. उन्हाळी आवर्तनासाठी साडेपाच टीएमसी पाणी, सणसर जोड कालवा सिंचनासाठी १.४९ टीएमसी आणि जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी पाणी देण्यात येईल. सिंचनासाठी एकूण ८.५९ टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. अशाप्रकारचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे.
पिकांना सलग ९० दिवस पाणी
उन्हाळी हंगामासाठी ११ मार्चपासून सुरू करण्यात आल्याने आवर्तन १० मेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या काळात सहा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार असून या कालावधीत तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सलग ९० दिवस उन्हाळय़ात पिकांसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्यात येणार आहे.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठय़ाचा आढावा
धरण पाणीसाठा टक्केवारी (टीएमसी)
टेमघर ०.४८ १२.८४
वरसगाव ६.१७ ४८.१०
पानशेत ५.६१ ५२,७१
खडकवासला ०.८५ ४२.८४
पवना ३.६७ ४३.०९
भामा आसखेड ४.८४ ६३.१२

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water storage dams reduced 1 5 tmc effect harsh summer dam chain project amy

ताज्या बातम्या