स्वच्छतागृहातील पाण्याचा पिण्यासाठी वापर

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या बाजार आवारात पाणपोईंची कमतरता जाणवत असल्याने बाजार आवारात येणारे शेतकरी तसेच खरेदीदारांना स्वच्छतागृहातील पाणी प्यावे लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे बाजार आवारातील पाणपोईंच्या परिसरात गर्दी होत आहे. पाणपोईंची संख्या कमी असून काही पाणपोईंची दुरवस्था झाली आहे.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांदा, बटाटा तसेच फळभाज्यांची वाहतूक करणारी पाचशे वाहने दररोज येत असतात. शहरातील किरकोळ विक्रेते दररोज सकाळी बाजारात खरेदीसाठी येतात. शेतीमाल खरेदीसाठी दररोज हजारो नागरिक येत असतात. बाजार आवारात असलेल्या गाळय़ांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आवारातील उपाहारगृहातून पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागतात.  शेतकरी तसेच किरकोळ ग्राहकांना बाजार आवारातील स्वच्छतागृहानजीक असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागतो. या परिसरात बऱ्याचदा अस्वच्छता असते. अनेक जण तेथील नळावर अन्य कामे करतात. त्यामुळे तहानलेले ग्राहक तसेच खरेदीदार नळाच्या परिसरात जाऊन बाटली भरुन घेतात. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे बाजार आवारात पाणपोईंची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी बाजार आवारातील घटकांकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, बाजारात प्रत्येक गाळय़ावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे काही आडते हॉटेलमधून पाण्याच्या बाटल्या विकत घेतात. काही आडते २५ लीटरच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी करून गाळय़ांवर ठेवतात. गाळय़ांवरील कामगार, शेतक ऱ्यांसाठी पाण्याची सोय नसल्याने विकत पाणी घ्यावे लागते. बाजार समितीकडून मार्केट यार्डाच्या आवारात पाणपोईंची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. पाणपोईंची संख्या अपुरी असून नवीन पाणपोई बांधायला हव्यात.

पाणपोईंचे काम आठवडाभरात मार्गी

बाजार आवारात ज्या भागात मोठय़ा संख्येने खरेदीदार, शेतकरी येतात, तेथे कुलर बसविण्यात येणार आहेत. तसेच पाहणी करून नवीन पाणपोई उभारणीचे काम आठवडाभरात हाती घेण्यात येणार आहे. बाजार आवारातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही ठिकाणी आणखी नळजोड घेण्यात येतील. सध्या असलेल्या पाणपोईंचे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी सांगितले.