पावलस मुगुटमल

पुणे : राज्याच्या सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात राज्य पाणीदार झाले आहे. राज्यातील मोठय़ा धरण प्रकल्पांत सध्या ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. या महिन्यात बहुतांश प्रकल्पांतून विसर्ग झाला असला, तरी सततच्या पावसाने पाणीसाठा कायम राहिला आहे. राज्यातील एकूण पाणीसाठा लक्षात घेता गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के पाणी अधिक असून, मुंबई परिसरासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे विभागातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत.

नाशिक, अमरावती विभागातही मोठा पाणीसाठा आहे. राज्यात सध्या सरासरीच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वच जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या पुढे झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता. ऑगस्टच्या शेवटी राज्यातील १४१ मोठय़ा धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला होता. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून पुन्हा विविध भागांत पावसाने जोर धरल्याने या कालावधीत पाणीसाठय़ात आणखी पाच टक्क्यांची भर पडली आहे. या कालावधीत उजनी, कोयना, जायकवाडी आदी राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमधून पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर विसर्ग झाला असला, तरी पावसामुळे पाणीसाठा कायम राहिला आहे. राज्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये सध्या ९५.७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो ५ टक्क्यांनी अधिक आहे.

 मोठय़ा प्रकल्पांसह राज्यातील मध्यम २५८ आणि लघु मध्यम २८६८ प्रकल्पांमध्ये मिळून ९० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा सुमारे ८ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागामध्ये ९३ टक्के इतका आहे. त्याखालोखाल पुणे विभागात ९२ टक्के पाणी जमा झाले आहे.

हलक्या सरींचा अंदाज

सध्या राज्यात बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील तीन दिवसांनंतर विदर्भ, मराठवाडय़ात हलक्या सरींचा अंदाज आहे. शेवटच्या टप्प्यातही पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पाणीसाठय़ात आणखी भर अपेक्षित आहे.  चौकट सततच्या विसर्गानंतरही उजनी १०० टक्के राज्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची धरणे असलेले कोयना, उजनी आणि जायकवाडी प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून काठोकाठ भरली आहेत. या तीनही धरणांतून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. कोयना धरणात सध्या ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात ९८ टक्के पाणी आहे. उजनी धरणामध्ये १०० टक्के पाणी आहे.

मोठय़ा प्रकल्पांतील विभागनिहाय पाणी विभाग

   सध्या   गतवर्षी

अमरावती   ९५.६१ टक्के ९५.३५ टक्के

औरंगाबाद   ९२.३२ टक्के ८४.०३ टक्के

कोकण  ९८.०५ टक्के ९८.५३ टक्के

नागपूर  ८८.३४ टक्के ८०.८८ टक्के

नाशिक  ९६.६९ टक्के ८९.७१ टक्के

पुणे ९८.३४ टक्के ९४.४५ टक्के