पिंपरी : निघोजे बंधाऱ्यावरून उचलल्या जाणाऱ्या अशुद्ध जलउपसा केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, देहू – आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर तसेच इंद्रायणीनगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात बुधवारी (७ ऑगस्ट) रात्री होणारा आणि गुरुवारी (८ ऑगस्ट) सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत निघोजे बंधाऱ्यावरून उचलल्या जाणाऱ्या अशुद्ध जलउपसा केंद्रावरील विद्युत पुरवठा बुधवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री अडीच वाजल्यापासून बंद आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद झालेला आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी तसेच देहू – आळंदी रस्ता बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर, इंद्रायणीनगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात बुधवारी (७ ऑगस्ट) रात्री होणारा आणि गुरुवारी (८ ऑगस्ट) सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>pune crime news: सोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार; बिबवेवाडी पोलिसांकडून दोघांना अटक
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. दक्षतेची खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
© The Indian Express (P) Ltd