प्रस्तावित समान पाणीपुरवठा योजनेचे वास्तव

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीगळती, चोरी रोखण्याबरोबरच वितरणातील त्रुटी तसेच असमानता दूर होण्याची शक्यता खूपच कमी आहे. योजनेंअंतर्गत चोवीस तास नाहीच, पण समान पाणीपुरवठाही होणार नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना नावालाच राहणार असून पाणीगळतीही होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरातील पाणीगळतीचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे. समान पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीगळती १५ टक्के राहील, असे योजनेच्या आराखडय़ातच स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ही योजना असतानाही पाणीगळती होणार हे यातून स्पष्ट होत आहे. दोन हजार किलोमीटर लांबीच्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्या कायम ठेवण्यात येणार असून नव्याने १ हजार ७०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र जुन्या जलवाहिन्यांतून होणाऱ्या गळतीचे काय, ती कशी थांबविणार, त्याबाबत कोणत्या उपाययोजना होणार, याबाबत प्रशासनाकडूनही हतबलता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेमुळे सद्य:स्थितीतील पाणीवितरण व्यवस्थेत फरसा बदल होणार नसल्याचे चित्र पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

घरोघरी जलमापक बसविण्यात आल्यामुळे नागरिकांना हवे तेव्हा पाणी मिळेल, असा दावा केला जात आहे. आराखडय़ानुसार प्रतिदिन प्रति माणशी १३५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. या निकषानुसारच पाणीवापर केला तरच सर्वाना पाणी मिळणार आहे.  पाण्याचा कोणी किती वापर करायचा हे निश्चित नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणाही नाही. जलमापक बसविण्यात येणार असल्यामुळे ज्याकडे जास्त पैसा त्याच्या घरी मुबकल पाणी, असा प्रकार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अवघ्या ६० टक्के  क्षेत्रात जलमापक बसविले जाणार आहेत. तर ४० टक्के भागात जलमापक बसविण्यात येणार नाहीत, असे आराखडय़ातच नमूद आहे. ४० टक्के भाग हा झोपडपट्टीचा आहे. त्यामुळे मीटर बसविण्यावरूनच योजनेची असमानता अधोरेखित होत आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचणार आहे, त्यामुळे भविष्यात टँकर भरणा केंद्र बंद होणार का, याचे उत्तरही महापालिका अधिकाऱ्यांकडे नाही.

योजनेत बेकायदा नळजोडांना ‘अभय’

शहराच्या अनेक भागात राजकीय वरदहस्ताने बेकायदा नळजोड घेण्यात आले आहेत. त्याबाबतची कोणतीही माहिती पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणाही अस्तित्वात नाही. समान पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही बेकायदा नळजोड उघडकीस येतील का, याबाबत योजनेत स्पष्टता नाही. कामे सुरू असताना बेकायदा नळजोड दिसतील पण कामे झाल्यानंतर बेकायदा नळजोड घेतले जाऊ शकतात, असे अधिकारीच सांगत आहेत. त्यामुळे बेकायदा नळजोडही घेतले जाणार, हे उघड होत आहे.