शहरात पाण्याची टंचाई भासत असताना बंद पुकारून पुणेकरांना वेठीला धरणाऱ्या टँकरचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले. जीपीएस यंत्रणा बसवायला नकार देणाऱ्या टँकरचालकांचे टँकर ताब्यात घेण्यात येतील, असाही इशारा प्रशासनाने दिला आहे.
पाणीटंचाईमुळे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून खासगी तसेच महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या टँकरची मागणी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत टँकरचालकांनी मोठी दरवाढ केली आहे. तसेच टँकरचालकांकडून पाण्याची चोरी आणि काळाबाजारही सुरू झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत पाण्याच्या चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवून घेण्याचा आदेश महापालिकेने काढला असून त्यासाठी सोमवार (२१ जुलै) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ज्या टँकरवर ही यंत्रणा नसेल त्या टँकरना पाणी न देण्याचाही आदेश काढण्यात आला आहे. महापालिकेने सक्ती केलेल्या जीपीएस यंत्रणेमुळे टँकर भरणा केंद्रातून टँकर निघाल्यानंतर तो नेमका कोणत्या ठिकाणी गेला हे समजणार आहे.
टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवून घेण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ही यंत्रणा बसवायला टँकरचालकांनी नकार दिला असून सोमवारपासून बेमुदत बंद सुरू करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे टँकरचालकांची मुजोरी स्पष्ट झाली आहे. टँकरचालकांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन महापालिका प्रशासन कठोर पावले उचलेल, असे शनिवारी सांगण्यात आले. महापालिकेचा आदेश न जुमानता जर टँकरचालकांनी बंद सुरू केला, तर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने संबंधितांचे टँकर जप्त केले जातील, असा इशारा नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिला आहे.