महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या टँकरचे दर जाहीर करण्यात आले असून त्या दरांपेक्षा अधिक दराची मागणी टँकरचालक वा ठेकेदाराकडून केली जात असेल, तर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी या संबंधीची माहिती शनिवारी दिली. टँकरची क्षमता व अंतर यानुसार हे दर ठरवण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहेत.
दहा हजार लिटरचा टँकर- पाच किलोमीटर अंतरासाठी ९०० रुपये, दहा किलोमीटर अंतरासाठी १,१०० रुपये आणि पंधरा किलोमीटर अंतरासाठी १,२५० रुपये.
दहा हजार ते पंधरा हजार लिटरचा टँकर- पाच किलोमीटर अंतरासाठी १,०५०, दहा किलोमीटर अंतरासाठी १,२५० आणि पंधरा किलोमीटर अंतरासाठी १,४०० रुपये असा दर राहील.
वीस हजार लिटरवरील टँकर- पाच किलोमीटर अंतरासाठी १,२०० रुपये,  दहा किलोमीटर अंतरासाठी १,३५० रुपये आणि पंधरा किलोमीटर अंतरासाठी १,५०० रुपये.
या दराबरोबरच सर्व टँकरचालकांनी त्यांच्या टँकरवर एक महिन्याच्या आत जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे टँकर कोठे भरण्यात आला व त्याद्वारे कोठे पाणीपुरवठा केला गेला यासह अन्य अनेक बाबींवर नियंत्रण ठेवता येणार आहे. जाहीर केलेल्या दरांपेक्षा अधिक दराची मागणी ठेकेदाराकडून केली जात असेल, तर तक्रार करण्यासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. या क्रमांकांवर तक्रार करता येईल. टँकर चालकाचे नाव, टँकरचा क्रमांक, दिनांक, वेळ, पाणी पुरवठा केलेले ठिकाण ही माहिती तक्रार करताना कळवावी. त्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.                                  मुख्य कार्यालय- २५५०१३९०,२५५०१३९१, एसएनडीटी केंद्र- २५५०१६५३, स्वारगेट केंद्र- २५५०८१५०, बंडगार्डन केंद्र- २५५०६८७०, लष्कर केंद्र- २५५०६०७०.