scorecardresearch

गारेगार किलगडांच्या दरात वाढ ; उन्हाच्या तडाख्यामुळे मागणी; बाजारात दररोज ५० ते ६० टन आवक

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात दररोज साधारणपणे ५० ते ६० टन किलगडांची आवक होत आहे.

पुणे : उन्हाचा तडाखा वाढल्याने गारेगार किलगडांच्या मागणीत वाढ झाली आहे. किलगडाच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो किलगडाची विक्री २० ते ३० रुपये दराने केली जात आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात दररोज साधारणपणे ५० ते ६० टन किलगडांची आवक होत आहे. नगर, सातारा, सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर परिसरातून किलगडे विक्रीस पाठविण्यात येत आहेत. यंदा किलगडांची लागवड वाढली आहे. येत्या काही दिवसांत किलगडांची आवक आणखी वाढेल, असे मार्केट यार्डातील किलगड व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले. शुगर क्वीन, मॅक्स, मेलडी, सीडलेस, सुप्रीत या जातीच्या किलगडांची आवक होत आहे.

सर्वाधिक मागणी शुगर क्वीन, मॅक्स, मेलडी या जातीच्या किलगडांना आहे. ही किलगडे रसाळ आहेत तसेच चवीलाही गोड आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात किलगडांचा हंगाम सुरू होतो. उन्हाच्या तडाख्यामुळे ज्युस सेंटर चालक, उपाहारगृहचालक तसेच फळ विक्रेत्यांकडून किलगडांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

१०० टनांपर्यंत उच्चांकी आवक

उन्हाच्या तडाख्यामुळे किलगडांना मागणी वाढली असून एप्रिल महिन्यात किलगडांची उच्चांकी आवक होते. साधारणपणे १०० टनांपर्यंत किलगडाची आवक एप्रिल महिन्यात होते. मुस्लीम धर्मीय रमजान महिन्यात उपवास करतात. उपवासामुळे किलगडांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष शेतकऱ्यांनी किलगडांची लागवड कमी केली होती. यंदाच्या वर्षी किलगडांची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. किलगडाची लागवड केल्यानंतर ६५ दिवसात फळ तयार होते. यंदा किलगडांना मागणी तसेच दरही चांगले मिळत असून किलगडांचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watermelon price increase as temperature rises zws

ताज्या बातम्या