पुणे : लोकसभा निवडणुकीत चारशेपारच्या घोषणेनंतर आता महायुतीने दोनशे आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाजपच्या नुकत्याच झालेल्या महाअधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोनशे जागा निवडून आणण्याची भूमिका मांडल्यानंतर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दोनशे आमदार निवडून आणण्याचे ध्येय असल्याचे नमूद केले. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील, हा विरोधकांचा विश्वास खोटा ठरेल. विरोधकांना दिवसा स्वप्न पडत आहेत. आम्हाला स्वप्न पहायला वेळ नाही. विरोधकांची दिवास्वप्ने खरी ठरणार नाहीत, अशी टीका केसरकर यांनी विरोधकांवर केली. पुण्यात राज्य मंडळात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर बोलत होते. राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा, महायुतीतील अस्वस्थता, जागा वाटप अशा विषयावर त्यांनी भाष्य केले. हेही वाचा - पेरूला कवडीमोल भाव, बागा काढून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ महायुती भक्कम आहे. आमच्यात कुठलाही वाद नाही. विधानसभेला २०० आमदार निवडून आणण्याचे ध्येय आम्ही ठेवले असून पुन्हा सत्तेत येऊ याची मला खात्री आहे, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धती पाहून मनसेचे नेते राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मनसे आणि महायुतीतील पक्षांमध्ये वैचारिक साम्य आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन करू. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, विधानसभा निवडणुकीतही ते आमच्यासोबत येतील, असेही त्यांनी सांगितले. हेही वाचा - पुणे : विद्यार्थ्यांना मारहाणीची शिक्षा, पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि वाघनखांवरील टीकेसंदर्भात विचारले असता ‘उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य लाभो. देव त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानण्याची सुबुद्धी देवो’ अशा शब्दांत केसरकर यांनी ठाकरे यांना टोला लगावला.