आम्ही जागांसाठी अडून बसणार नाही. शिवसेना, भाजपला हवे असेल तर आमच्या पण जागा घ्या पण भांडण मिटवा, असे आवाहन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पुण्यात केले. त्याचबरोबर २१ तारखेपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटला नाही, तर आम्ही स्वतंत्रपणे लढू, असा इशाराही त्यांनी दिला.
जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही पक्षांकडून उघडपणे कोणतीही भूमिका मांडण्यात येत नसली, तरी याच मुद्द्यावरून महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राजू शेट्टी यांनी बुधवारी दोन वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. गुरुवारी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना जास्त जागा मागते, असे चित्र उगाचच रंगविण्यात येत होते. खरं कोण जागा जास्त मागतंय, हे आता सगळ्यांना कळले असेलच. आम्ही जागांसाठी अडून बसणार नाही. ते देतील तितक्या जागा लढवायची आमची तयारी आहे. त्यांना हवं असेल तर आमच्यापण जागा घ्या, पण भांडण मिटवा, असे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील ६३ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. आमची सर्व तयारी झालेली आहे. येत्या २१ तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. त्यादिवशी आमच्या कार्यकारिणीची बैठक बोलवली आहे. तोपर्यंत काहीच तोडगा न निघाल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.