नैऋत्य मोसमी पावसाचा वायव्य भारतातून परतीचा प्रवास सोमवार, २५ सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मोसमी पाऊस सामान्यपणे एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो आणि १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेतो. १५ ऑक्टोबपर्यंत देशातून पूर्णपणे माघार घेतो. यंदा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. सोमवारी, २५ सप्टेबरपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ शकते. परतीचा प्रवास लांबण्याची ही तेरावी वेळ आहे.
हेही वाचा >>> कमी पटसंख्येच्या शाळांवर घाला; राज्यभरात समूह शाळांची निर्मिती
यंदाच्या पावसाळय़ात २२ सप्टेंबपर्यंत देशात सरासरी ९४ टक्के पाऊस पडला आहे. देशात पावसाळय़ात सरासरी ८३२.४ मिमी पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात ७८०.३ मिमी पाऊस पडला आहे. एल-निनोचा ऑगस्ट आणि सप्टेबर महिन्यांतील पावसावर विपरीत परिणाम झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. जूनमध्ये देशात पाऊस सक्रिय झाला नाही. जुलैच्या अखेरीस देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाला. बंगालच्या उपसागरात सतत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाने सरासरी भरून काढली.
ऑगस्ट सर्वात कोरडा, उष्ण
यंदाचा ऑगस्ट महिना १९०१ नंतरचा सर्वात कोरडा महिना आणि भारतातील आजवरचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. ही स्थिती एल-निनोमुळे निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मात्र, यंदाच्या पावसाळय़ात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी पावसाला हातभार मिळाला आहे.