व्यवसायाने सर्जन असलेले डाॅ. राजीव देशमुख यांना चित्रकलेची आवड. त्यांनी हा छंद जीवनभर जपला. आपल्या छंदातून निर्माण झालेल्या कलाकृतींचे त्यांनी १५ वर्षांपूर्वी एक प्रदर्शन भरवले होते, त्याचे नाव होते, ‘सेरेनिटी’. छंद, रसिकता याबरोबरच सामाजिक आवड जपणारे डाॅक्टर या चित्रकला प्रदर्शनाच्या निमित्ताने सामाजिक कार्याला हातभारही लावतात. आपल्या छंदातून डाॅक्टरांना आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी मनःशांती मिळते. तीच मनःशांतीची सकारात्मकता चित्रकलेच्या रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी ‘सेरेनिटी २’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ते रविवारपर्यंत (दि. २५) घोले रस्त्यावरील ‘राजा रवी वर्मा कलादालनात’ सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
१. आपण सर्जन आहात, मग चित्रकला या सृजनात्मक कलेकडे कसे वळलात ?
– मी जलरंगातील चित्रे बऱ्याच वर्षांपासून काढतो आहे. मध्यंतरी थोडा खंड पडला होता. मिलिंद मुळीक यांचे पहिले पुस्तक ‘वॉटर कलर्स’ पासून स्फूर्ती घेऊन पुन्हा चित्रे काढू लागलो. नंतर मी सर्जन झालो ! चित्रकारी त्याआधीची सर्जनकी नंतरची ! सर्जरी सुद्धा एक प्रकारची सृजनात्मकताच असल्याचे मी मानतो.
२. चित्रकलेसाठी कोणाचे मार्गदर्शन घेतलेत ?
– चित्रकार रवी परांजपे यांचा माझा स्नेह पन्नासहून अधिक वर्षांचा होता. त्यांनी मला पहिल्यापासूनच प्रोत्साहन दिले. रवी परांजपे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही केवळ स्नेहापोटी त्यांनी मला मार्गदर्शन केले. जलरंगातल्या खुबींपासून ते कंपोझिशनपर्यंत वेगवेगळ्या बाबी त्यांनी मला प्रेमाने सांगितल्या. माझे सेरेनीटी हे चित्र प्रदर्शन पंधरा वर्षांपूर्वी बालगंधर्व कला मंदिरात झाले, ते केवळ रवी परांजपे माझ्यामागे उभे होते म्हणूनच.
३. आपण आपल्या व्यस्त दिनक्रमात हा छंद कसा जोपासता?
– आपण जसं आपल्या प्रियजनांसाठी आवर्जून वेळ काढतो, त्याप्रमाणे चित्रकलेच्या आवडीमुळे जो वेळ मिळेल त्यात चित्रे काढायची व रंगवायची, यात मला आनंद मिळतो, एक वेगळीच शांतता मिळते.
४. शांतता हा विषय या प्रदर्शनासाठी निवडावा असे का वाटले?
– या धकाधकीच्या जीवनात आणि जीवघेण्या संघर्षात जसे आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत आवर्जून निसर्गरम्य ठिकाणी जातो, तसेच मला निसर्ग चित्रे काढताना वाटते. नवरसांमधील एक रस म्हणजे शांतता. ती निसर्गामध्ये वेळ घालविल्यानंतरच अनुभवता येते. त्याच शांत रसात माझी सगळी चित्रे आहेत, मग ते आकाशातील रंगांच्या छटा पाहतानादेखील मन वेगळा विचार करू लागते, तसेच डोंगरदऱ्या, नदी नाले, हिरवीगार वनश्री न्याहाळताना त्यातील प्रसन्न शांतता अनुभवता येते. त्यामुळे आताच्या प्रदर्शनाचे नाव सुद्धा ‘सेरेनिटी टू’ असे आवर्जून ठेवले आहे. चित्रात उमटलेली शांतता पाहताना रसिकांच्या मनातही शांतता उत्पन्न होऊ शकेल, याची मला खात्री वाटते.
५. आतापर्यंत कोणकोणत्या विषयांवर चित्रे काढली आहेत?
– कुठल्याही एका विषयावर माझी चित्रे नाहीत. मला स्वतःला पाण्यात पडणारी प्रतिबिंबे आणि वस्तू किंवा व्यक्ती यांच्या पडलेल्या सावल्या भावतात. त्यामुळे माझ्या बऱ्याच चित्रात पाणी असते. मग ते नदीचे वाहते पाणी असो, तलावातले स्तब्ध पाणी असो, किंवा समुद्रातले लाटांवरून दौडत येणार पाणी असो. अशी पाण्याची विविध रूपे माझ्या चित्रांमध्ये सर्वाधीक दिसतील.
६. दुसरे चित्र प्रदर्शन भरवताना तुमच्या काय भावना आहेत?
– माझ्या पहिल्या प्रदर्शनातून मला कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप’ या संस्थेला मदत करता आली. या दुसऱ्या प्रदर्शनातून मला ‘रोटरी फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलता येणार आहे. कलेच्या माध्यमातून मला सामाजिक कार्यासाठी मदत करता येते आहे, याचा आनंद आहेच. पण या प्रदर्शनाच्या निमित्ताने माझे गुरू रवी परांजपे यांना आदरांजली अर्पण करण्याची संधीही मिळाली आहे. अर्थातच त्यांची अनुपस्थिती मनाला व्यथित करतीये, पण त्यांनी केलेले मार्गदर्शन घेऊन माझी चित्रकला बहरली आणि त्यांच्यामुळे माझ्या छंदाद्वारे मी रसिकांच्या मनात शांतता निर्माण करण्यास सहाय्यभूत होऊ शकतोय, हेही माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
shriram.oak @ expressindia.com
