नव्या वर्षांच्या स्वागतासाठीची तयारी जोरात सुरू आहे. नववर्षांचे स्वागत करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी. ज्यांनी नव्या वर्षांच्या स्वागतासह विविध कारणांचा आनंद साजरा करण्यासाठी दारूच प्यायची असे ठरवले होते आणि मग हळूहळू दारूनेच ज्यांचा कब्जा घेतला होता असे काही जण गुरुवारी (३१ डिसेंबर) रात्री नव्या वर्षांचे स्वागत करणार आहेत; पण त्यांची नववर्ष स्वागताची पद्धत मात्र यंदा निराळी आहे.
सिंहगड रस्त्यावरील ‘कृपा फाऊंडेशन’ या व्यसनमुक्ती केंद्रात बुधवारी संध्याकाळपासूनच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात येत होती. केंद्रातील तीस जण, स्थानिक महिला, पुरुषांसह आणि जे व्यसनमुक्तीचे धडे घेऊन तेथून बाहेर पडले आहेत, ते देखील केंद्रामधील नववर्षांच्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. व्यसनमुक्ती केंद्राच्या बाहेर असताना मनावरचा ताबा सुटला तर या प्रश्नाबरोबरच आपल्या समुपदेशक आणि आपल्यासारख्याच सहवेदना असणाऱ्या मित्रांबरोबर आनंद साजरा करणे हा यामागील उद्देश आहे.
कॅरम, टेबल टेनिस, संगीत खुर्ची, शेकोटीसह गाणी-भेंडय़ा, नृत्य, सिनेमा अशा विविध कार्यक्रमांचा उद्देश केवळ आनंद आणि आनंद मिळविणे हाच असल्याचे केंद्रातील समुपदेशक सुरेश पिल्ले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
यापूर्वी आम्ही बाहेर असताना नव्या वर्षांचे स्वागत करताना दारू पिऊन नाचायचो, किंबहुना आम्हाला दारूशिवाय नाचताच यायचे नाही, पण येथे मात्र आम्ही दारूशिवाय नाचणार असल्याचे व्यसनमुक्तीसाठी आलेल्या एकाने सांगितले.

फक्त एकदाच दारू घेतली म्हणजे सगळ्यांना ती व्यसनाधीनतेकडे नेतेच असे नाही, पण ती एकदा घेतल्यामुळे दारूचे आकर्षण निर्माण होऊ शकते. हळूहळू दारू म्हणजेच आनंद असे वाटायला लागले तर मात्र व्यसनाधीनतेकडे वाटचाल सुरू होऊ शकते. व्यसनाधीनता हा एक प्रकारचा रोग असल्याचे डब्लू.एच.ओ.ने प्रमाणित केले आहे. नवीन काहीतरी करून बघण्यासाठी ३१ डिसेंबरची संध्याकाळ निवडली जाते आणि दारूचे सेवन केले जाते. यामध्ये लहान मुले तसेच तरुणाईची संख्या जास्त असून तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक असते.
– डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ