पुणे : पश्चिम आशियातील युद्धाचे चटके आता देशातील गृहनिर्माण क्षेत्रालाही बसू लागले आहेत. होर्मूझच्या सामुद्रधुनीतून बांधकाम साहित्याचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पर्यायी जलमार्गाने बांधकाम साहित्याची वाहतूक होत आहे. त्यातून वाहतूक खर्चात वाढ झाली असून, त्याचाच परिणाम होऊन बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात घरांच्या किमती महागणार आहेत.
अनारॉक ग्रुपने सध्या सुरू असलेल्या युद्धाचा देशातील गृहनिर्माण क्षेत्रावर होणारा परिणाम मांडणारा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जलवाहतूक खंडित झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात बांधकाम साहित्य घेऊन येणाऱ्या जहाजांना दूरच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
त्यातून त्यांच्या प्रवासाच्या वेळेत १० ते २० दिवसांची वाढ झाली असून, प्रतिकंटेनर वाहतूक खर्चात १.५ ते ३.५ लाख रुपये वाढ झाली आहे. सागरी इंधन आता प्रतिटन १ लाख रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे एकंदरीत बांधकाम साहित्याचा वाहतूक खर्च वाढल्याने त्यांच्या किमतीतही वाढ नोंदविण्यात आली आहे.
पोलादाची किंमत प्रति टन ६२ हजार रुपयांवरून २० टक्क्यांनी वाढून ७२ हजार रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरात गगनचुंबी इमारतींच्या बांधकाम खर्चात प्रतिचौरसफूट ५० रुपये वाढ होणार आहे. सध्या मुंबईत आलिशान घरांचे १० हजारांहून अधिक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी क्रेन आणि मिक्सरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिपिंप १०० डॉलरच्या पुढे गेला आहे. यामुळे डिझेलच्या दरात वाढ अपेक्षित आहे. क्रेन आणि मिक्सरसाठी डिझेलचा वापर होत असल्याने त्याचा फटकाही बसणार आहे. यामुळे बांधकाम खर्चात आणखी वाढ अपेक्षित आहे. अॅल्युनिमिअचे प्रकल्प बहारीन आणि कतारमध्ये आहे. सध्या त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अॅल्युमिनिअमची किंमत प्रतिटन ३.५ लाख रुपयांवर गेली आहे. मुंबईसह दिल्ली, हैदराबाद आणि इतर महानगरांमध्ये याचे परिणाम दिसून येतील, असे अहवालात म्हटले आहे.
वाढीचे चक्र कायम
मुंबई आणि दिल्ली या महानगरांत गेल्या चार वर्षांत बांधकाम खर्चात ३९ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी मजूर खर्च हा प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी २५ ते ३५ टक्के असतो. त्यातही गेल्या ४ ते ५ वर्षांत २५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यातच आता बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्याने एकूण बांधकाम खर्चही वाढणार आहे. त्यातून आगामी काळात घरांच्या किमती वाढत जातील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोट
आखाती देशातील अनिवासी भारतीय हे देशातील आलिशान घरांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. मुंबई आणि दिल्लीतील आलिशान घरांपैकी १५ ते २२ टक्के ग्राहक हे अनिवासी भारतीय आहेत. पश्चिम आशियातील युद्धामुळे हवाई प्रवासही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे अनिवासी भारतीय देशात येऊन घरांची खरेदी करण्याचे प्रमाण कमी होत आहे.
- डॉ. प्रशांत ठाकूर, कार्यकारी संचालक, अनारॉक ग्रुप
