पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलपीजी) सिलिंडरच्या किमतीत ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, त्याचा फटका मिठाई उद्योगाला बसत आहे. त्यातच खाद्यतेल, डाळींसह इतर किराणा मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे मिठाई उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याचाच परिणाम म्हणून उत्पादकांनी मिठाईच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आगामी काळात महागाईची तीव्रता कायम राहिल्यास मिठाई आणखी महागण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम आशियातील युद्धानंतर व्यावसायिक वापराच्या ‘एलपीजी’ सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला. अजूनही हा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्याचा मोठा फटका मिठाई उद्योगाला बसत आहे. सध्या उद्योगाच्या एकूण गरजेच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत पुरवठा होत आहे. यामुळे इंधन टंचाईच्या झळा या उद्योगाला बसत आहेत. अनेक मिठाई उत्पादक लाकूड, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा इंधन पर्यायांकडे वळले आहेत. मात्र, हे पर्याय खर्चिक असल्याने उत्पादनखर्चात वाढ होत आहेत. त्यातच युद्ध सुरू झाल्यापासून एलपीजी सिलिंडरसह खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचबरोबर डाळींच्या किमतीतही वाढ सुरू असल्याने मिठाई उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे अनेक मिठाई उत्पादकांनी मिठाईच्या किमतीत १० टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. याचे थेट चटके ग्राहकांना बसू लागले आहेत.

उत्पादन खर्चात १५ टक्के वाढ

‘खाद्यप्रक्रिया उद्योगावर एलपीजी टंचाईचा परिणाम झाला आहे. ‘एलपीजी’ टंचाई असल्याने डिझेलचा वापर सध्या केला जात आहे. यामुळे उत्पादन खर्चात १५ टक्के वाढ होत आहे. ‘एलपीजी ओव्हन’चा वापर होत असलेल्या मिठाईच्या उत्पादनात सुमारे २५ टक्के कपात होत आहे. दुधापासून मिठाईचे उत्पादन करणारे मिठाईवाल्यांना डिझेलचा वापर करता येत नाही. कारण दुधाला त्याचा वास लागतो. त्यामुळे त्यांना इंधन म्हणून लाकडाचा वापर करावा लागत आहे. ‘एलपीजी’ तुलनेत इतर इंधन पर्याय खर्चिक असल्याने उत्पादनखर्चात वाढ होत आहे. त्याचा परिणाम चालू तिमाहीत या क्षेत्रातील उद्योगांच्या आर्थिक कामगिरीवर होऊ शकतो,’ असे चितळे बंधू मिठाईवाले संस्थेचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी स्पष्ट केले.

मिठाईच्या किमतीत वाढ अटळ

‘व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. सध्या मागणीच्या २० ते ४० टक्के सिलिंडर पुरवठा होत आहे. एलपीजी टंचाईमुळे मिठाईवाले लाकूड आणि डिझेल भट्ट्यांचा वापर करीत आहेत. परंतु, एलपीजीच्या तुलनेत हे इंधन पर्याय सुमारे ३० टक्के अधिक खर्चिक ठरतात. याच वेळी खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडाल्याने प्लास्टिकच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम होऊन प्लास्टिक पॅकेजिंग महागले आहे. याच वेळी खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून मिठाईवाल्यांकडून किमतीत सरासरी १० टक्के वाढ झाली आहे. आगामी काळात हे चित्र असेच राहिल्यास मिठाईच्या किमतीत २० ते ३० टक्के वाढ होऊ शकते,’ असे काका हलवाई फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन गाडवे यांनी नमूद केले.

आंबा बर्फी, काजूकतली महाग

यंदा अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनाला फटका बसला आहे. आंबा उत्पादन कमी असल्याने पल्पसाठी तो कमी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आंबा बर्फीसाठी पल्प पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आगामी काळात आंबा बर्फीच्या किमती वाढणार आहेत. याच वेळी अवकाळी पावसामुळे काजू उत्पादनावरही परिणाम झाला असून, काजूकतलीही महागणार आहे, असे निरीक्षण मिठाई उत्पादकांनी नोंदविले.

महागाईच्या झळा

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमधील फेब्रुवारीपासून वाढ : १३०८ रुपये

खाद्यतेल वाढ : प्रतिलिटर २० ते २५ रुपये

डाळींच्या किमतीतील वाढ : प्रतिकिलो १० ते १५ रुपये

प्लास्टिक पॅकेजिंगमधील वाढ : १५ टक्के