पुणे : पश्चिम घाटात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ज्ञात कीटकांच्या विविधतेमध्ये ३५ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. ही घट, तसेच नैसर्गिक अधिवासांचा झालेला ऱ्हास चिंताजनक असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील डॉ. पंकज कोपर्डे, पीएचडी विद्यार्थी अराजुश पायरा, अमेय देशपांडे, केरळमधील सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीजचे रेजी चंद्रन यांच्या संशोधन गटाने कीटक प्रजातींचे सर्वेक्षण केले. फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये पाच राज्यांमधील १४४ ठिकाणी कीटकांच्या ओडोनाटा प्रजातींपैकी चतुर आणि टाचणी या प्रजातींचे मॅपिंग करण्यात आले.

संशोधकांनी नद्या, ओढे, धबधबे, तलाव, सरोवरे आणि धरणे यांसारख्या गोड्या पाण्यातील अधिवासांमध्ये काम केले. सर्वेक्षणामध्ये ओडोनाटाच्या १४३ विविध प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यात पश्चिम घाटातील वैशिष्ट्यपूर्ण अशा ४० प्रजातींचा समावेश आहे. त्यातील चतुर (ड्रॅगन फ्लाय) आणि टाचणी (डॅमसेल्फ्लाय) या कीटकांच्या केवळ ६५ टक्के प्रजातींचे दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.

ओडोनाटा हे पर्यावरणातील बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असतात. त्यांचे पुनरुत्पादन पूर्णपणे गोड्या पाण्यातील परिसंस्थेवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना ‘इंडिकेटर टॅक्सा’ (पर्यावरणीय सूचक) मानले जाते. त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती प्रत्यक्ष जलस्रोतांचे पर्यावरणीय आरोग्य दाखवते. त्यामुळे सर्वेक्षणात न सापडलेल्या प्रजाती परिसंस्थेवर येत असलेल्या तणावांचे ते संकेत असू शकतात, असे संशोधकांनी नमूद केले.

‘नोंद करण्यात आलेल्या प्रजातींपैकी एलाटोनेउरा सौटेरी, प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा आणि सायक्लोगॉम्फस यप्सिलॉन या तीन प्रजाती सध्या ‘असुरक्षित’ म्हणून वर्गीकृत आहेत. मात्र, सर्वेक्षणातील बहुतेक प्रजाती ‘आययूसीएन’च्या धोकाग्रस्त प्रजातींच्या यादीत ‘माहितीचा अभाव’ आणि ‘मूल्यांकन न झालेली’ या श्रेणींमध्ये येतात,’ असे सांगण्यात आले.

राज्यांनुसार आढळलेल्या प्रजाती

संशोधनामध्ये राज्यानुसार आढळणाऱ्या विविधतेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वाधिक १०५ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या महाराष्ट्रात १०० प्रजातींची नोंद झाली. त्यात १२ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा समावेश आहे. केरळमध्ये १४ ठिकाणी घेतलेल्या नमुन्यांत आढळलेल्या ८३ प्रजातींपैकी ३३ वैशिष्ट्यपूर्ण होत्या. कर्नाटकातील १७ ठिकाणी ६४ प्रजाती आणि ६ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींची नोंद झाली. गोव्यातील ३ ठिकाणी ३५ प्रजातींसह ४ वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती, गुजरातमध्ये ५ ठिकाणी १८ प्रजाती आढळल्या. मात्र, तिथे एकही वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आढळली नाही, अशी माहिती संशोधकांनी दिली.

ओडोनाटाच्या आजवरच्या सर्वांत व्यापक सर्वेक्षणांपैकी एक असलेल्या या सर्वेक्षणातून दक्षिण ते उत्तर अशा रचनेत बदल दिसून आला. पश्चिम घाटातील ज्ञात ओडोनाटा प्रजातींपैकी फक्त ६५ टक्के प्रजातींची या सर्वेक्षणात नोंद झाली. त्यामुळे आता याबाबत अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.

  • डॉ. पंकज कोपर्डे, संशोधक