What Advice Supriya Sule gives To Parth Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह दिवंगत नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा राज्यसभेसाठी आज (०५ मार्च) अर्ज सादर करण्यात आला. विधान भवन मुंबई येथे यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शरद पवारांच्या उमेदवारीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळेंनी दोन्ही पक्षाचे आभार मानले तसेच, पहिल्यांदाच राज्यसभेवर जात असलेल्या पार्थ पवारांना यावेळी मोलाचा सल्ला देखील दिला.
सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काय सल्ला दिला?
पहिल्यांदाच राज्यसभेवर जात असलेल्या पार्थ पवारांना आत्या म्हणून काय सल्ला द्याल? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. सुळेंनी यावेळी शरद पवारांनी त्यांना दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ दिला. “लोकसभा आणि राज्यसभेत कान उघडे ठेवायचे, कमी बोलायचे, बोलण्याची संधी मिळेल त्यावेळी अभ्यासपूर्ण बोलायचं”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “सभागृहात बसलेले सदस्य खूप जाणकार असतात, देश आपल्याकडे पाहत असतो त्यामुळे खूप जबाबदारीचे काम असते”, असेही सुळेंनी पुढे नमूद केले.
शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण
पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेत पायऱ्यांवर पाय ठेवताना शरद पवारांनी मोलाचा सल्ला दिला होता, याची आठवण यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितली. “बारामती मतदारसंघामुळे ही पायरी चढण्याची संधी मिळाली हे कायम लक्षात ठेवं”, असं शरद पवारांनी सांगितल्याचे सुळे म्हणाल्या. या भावनेशी प्रामाणिक राहण्याचा प्रत्येक सदस्य प्रयत्न करत असतो. “जर विचारले तर एक आत्या म्हणून, बहीण म्हणून अथवा सहकारी म्हणून माझ्या वडिलांनी दिलेला सल्ला मी प्रत्येकाला देईन”, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
अजित पवार अपघाती मृत्यूचा पारदर्शक तपास व्हावा – सुळे
अजित पवार यांचा अपघाती झालेल्या मृत्यूची पारदर्शक तपास व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे, असे खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. रोहित पवार याबाबत सातत्याने मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जय – पार्थ पवार आणि राज्यातील अजित पवारांवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक देखील याची मागणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
