गव्हाच्या दरात क्विंटलमागे चारशे रुपयांची घट

यंदा गव्हाचे उत्पादन मुबलक झाले आहे.

|| राहुल खळदकर

यंदाच्या हंगामात मुबलक पीक; मध्य प्रदेशातून आवक सुरू

पुणे : दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात वाढलेले गव्हाचे दर आता उतरले आहेत. सध्या राज्याच्या बाजारांत नव्या गव्हाची मुबलक आवक सुरू झाल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गव्हाच्या दरात घसरण झाली आहे. सध्या गव्हाच्या दरात क्विंटलमागे चारशे रुपयांनी घट झाली आहे.

गव्हाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात तसेच पंजाबमध्ये होते. महाराष्ट्राच्या काही भागांत गव्हाची लागवड केली जाते. पंजाबमधील गहू उत्तरेकडील राज्यांत विक्रीसाठी पाठविला जातो. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि गुजरातमधील गव्हाची आवक मोठय़ा प्रमाणावर होते. मध्य प्रदेशात अवकाळी पावसामुळे गव्हाच्या लागवडीवर परिणाम झाला होता. त्यामुळे बाजारात गव्हाची आवक मागणीच्या तुलनेत कमी होती.

दोन ते तीन महिन्यांपूर्वी गव्हाच्या दरात वाढ झाली होती. किरकोळ बाजारात एक किलो गव्हाच्या दरात साधारणपणे तीन ते सहा रुपयांनी वाढ झाली होती. घाऊक बाजारात गव्हाच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डातील गव्हाचे व्यापारी विजय नहार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. नहार म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी गव्हाचा प्रतिक्विंटलचा दर २७०० ते ३२०० रुपये होता. नवीन गव्हाची आवक सुरू झाल्यानंतर प्रतवारीनुसार गव्हाचे प्रतिक्विंटलचे दर २३०० ते २८०० रुपये असे आहेत. मध्य प्रदेशातून नवीन गव्हाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी आले आहेत. सध्या किरकोळ बाजारात एक किलो गव्हाचा दर प्रतवारीनुसार २५ ते ३६ रुपये असा आहे. गारपीट तसेच अवकाळी पाऊस झाला नाही तर गव्हाचा हंगाम चांगला होईल.

यंदा गव्हाचे उत्पादन मुबलक झाले आहे. मध्य प्रदेशातून नवीन गव्हाची आवक सुरू झाली असून, सध्या दररोज १८ ते २० ट्रक गहू विक्रीसाठी पाठविला जात आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता सध्या तरी नाही.

प्रतिक्विंटल गव्हाचे दर

लोकवन         २५०० ते ३०००  रु.

सरबती ३००० ते ३५०० रु.

 

– विजय नहार, गव्हाचे व्यापारी,  श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड,         भुसार बाजार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wheat prices fall by rs 400 a quintal akp