मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांच्या तयारीसाठी सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. पुण्यातील मनसे नगरसेवक बाबर यांच्या कोंढवा परिसरातील ई लर्निंग शाळेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी त्यांनी बोलताना आमच्या शालेय काळात करोना कुठे होता असे म्हटले आहे.

“भूमीपूजन झाल्यावर ती वास्तू उभी राहणे हे महत्त्वाचे आहे. नाहीतर आजपर्यंत आम्ही फक्त भूमीपूजनाच्या पाट्या पाहिल्या आहेत. माझे सगळेच नगरसेवक जिथे निवडून आले तिथे त्यांनी उत्तम काम केले. आज शाळांमध्ये ई लर्निंगचा वापर केला जात आहे. आमच्यावेळी असे काही नव्हते. लर्निंगलाच फक्त आम्ही ई म्हणायचो. आज दोन वर्ष झाली सगळ्या शाळा बंद आहेत. काही ठिकाणी हळूहळू शाळा भरत आहेत. काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत. गेली दोन वर्ष करोनामुळे सगळे विस्कळीत झाले आहे. पण मला एक खंत आहे, परीक्षा न देता १० वीचे विद्यार्थीही पास झाले आहेत. मी विचार करत होतो आमच्यावेळी तो करोना होताच कुठे? आमची दहावी आम्ही धडधडत पास केली आणि करोना इतक्या वर्षांनी आला. इतक्या वर्षांनी आल्यानंतर विद्यार्थ्यांना इतके गुण मिळाले आहेत. माझे गुण तुम्हाला कळले तर कमालचं वाटेल,” असे राज ठाकरे म्हणाले.

“ह्यांच्या घरी पोर होईल का याचं उत्तर मी काय देणार?”; राज ठाकरेंच्या उत्तराने फुटले हसू

“घरातून शिक्षण घेण्यामुळे शाळेतली मजाच निघून गेली. पहिली दुसरीतले विद्यार्थी आता शाळा बघतील. शाळा सुरु होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. माझी शिक्षकांना विनंती आहे की, ई लर्निंग वगैरे या गोष्टी चांगल्या आहेत. पण मला भीती वाटते की पुढे दहा बारा वर्षानंतर येणारी मुले ही लिहू शकतील का नाही. सर्वंच मोबाईल आणि कम्प्युटरवर असेल तर यांची अक्षरांची ओळख होणार आहे की नाही याची भीती वाटते,” असे राज ठाकरे म्हणाले.

“मग आता काय…”; देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय या राहुल गांधींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

“मला यायला उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. एका टुमदार पुण्याचे आक्राळ विक्राळ स्वरुप झालेले आहे. पुणे कुठपर्यंत पसरले आहे हे कुणालाच माहिती नाही. पुणे महापालिका कुठ पर्यंत या शहराला पैसे देऊ शकणार आहे याची मला कल्पना नाही. पण माझे नगरसेवक असतील तर निश्चित या सर्व गोष्टी होतील. कारण माझे सहकारी काम करणारे आहेत,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.