पिंपरी : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळाली आहे. जाधववाडी-चिखली येथील गट नंबर ५३९ मधील नऊ एकर जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि कवायत मैदानाकरिता देण्यास राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली. या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती १५ ऑगस्ट २०१८ मध्ये करण्यात आली. आयुक्तालयाचे कामकाज सुरु होऊन सहा वर्षे झाली. परंतु, आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळालेली नव्हती. देहूगाव गायरान येथील ५० एकर जागा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी देण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, या जागेला देहू देवस्थान, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. ही जागा उपलब्ध होण्यास विलंब आणि अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे मोशी येथील गायरान जागेचीही पोलीस आयुक्तालयासाठी पाहणी केली होती. परंतु, त्या जागेचाही पर्याय मागे पडला.

हेही वाचा >>>पुणे : दारू पिऊन गाडी चालवल्यास वाहन परवाना होणार रद्द

सहा वर्षांपासून पोलीस आयुक्तालयास स्वतंत्र जागा, शासकीय इमारत उपलब्ध नाही. सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालयसुद्धा महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरुपात सुरु आहे. कामकाजाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने यासाठी जागा मिळण्याकरिता पोलिसांनी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जाधववाडी, चिखली येथील गट नंबर ५३९ मधील ३ हेक्टर ३९ आर जागेत आयुक्तालयाची भव्य वास्तू उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. या शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करावा लागेल. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक राहील, अशा अटींवर या जागेला मान्यता देण्यात आली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या मालकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील डिस्ट्रीक सेंटरमधील १५ एकर जागाही यापूर्वीच मिळाली आहे. येथे अधिकारी, कर्मचा-यांसाठी निवासस्थाने आणि तांत्रिक कार्यालय उभारण्याचे नियोजन आहे. श्वान पथकासाठी (डॉग स्क्वॉड) फौजदार, अधिकारी कर्मचारी देण्यासही शासनाने मान्यता दिली.

हेही वाचा >>>पिंपरी : चार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा अन् मुख्यमंत्री म्हणतात, “पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीचोरी…”

चिखली परिसर प्रशासकीय संस्थांचा केंद्रबिंदू

पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी चिखलीत जागा निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, मोशी रुग्णालय, राज्यघटना भवनही या भागातच उभारले जात आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र या भागात आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील हा परिसर आता प्रशासकीय संस्थांचा केंद्रबिंदू म्हणून नावारुपाला येत आहे.

आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पण, आयुक्तालयासाठी स्वतंत्र- हक्काची इमारत नव्हती. त्यासाठी राज्य शासन आणि संबंधित विभागांकडून सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.-महेश लांडगे,आमदार, भोसरी

पोलीस आयुक्तालय महापालिकेच्या इमारतीच्या जागेवर भाडेतत्वार आणि अपु-या जागेत होते. त्यामुळे विविध अडचणी येत होत्या. चिखलीत नऊ एकर जागा उपलब्ध झाली आहे. वास्तुविशारदामार्फत डिझाइन तयार केली जाईल. लवकरच प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. न्यायालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस आयुक्तालय जवळच होत असल्याने नागरिकांना फायदा होईल.-विनयकुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where will the pimpri chinchwad police commissionerate be set up pune print news ggy 03 amy
Show comments