scorecardresearch

“…म्हणून सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदाची संधी आम्ही सोडून दिली;” जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

यावेळी त्यांनी नवाब मलिक प्रकरणावरही भाष्य केलं.

मुख्यमंत्री करण्याची संधी राष्ट्रवादी पक्षाकडे आली होती. पण, आघाडीत एकत्रित काम करायचं होत म्हणून ती संधी आम्ही सोडून दिली, असं वक्तव्य मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. ते तळेगाव येथे सभेत बोलत होते. तसेच, २०२४ च्या  विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून जास्तीत जास्त आमदारांना निवडून आणायचा असून ती भेट शरद पवार यांना द्यायची आहे, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

‘सरकार लवकरच पडणार’ या भाजपाच्या दाव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले “गेली सव्वादोन वर्ष…”

जयंत पाटील म्हणाले की, “एकदा ७२ आमदारांच्या संख्येवर पोहचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. आघाडीत एकत्रित काम करूयात, सर्वांना बरोबर घेऊयात म्हणून ती संधी आम्ही सोडून दिली. पण महाराष्ट्रामध्ये २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द बाळगली पाहिजे. शरद पवार यांनी पक्षासाठी उभं आयुष्य वेचलं आहे. आजही शरद पवार हे २४ तास काम करतात. हे सर्व आपण पहात आहोत. त्या पवार साहेबांना २०२४ च्या विधानसभेत सगळ्यात मोठी भेट म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून जास्तीत जास्तीत आमदार निवडून आणायचे आहेत,” असं ते म्हणाले.

जयंत पाटलांचा किरीट सोमय्यांना टोला; म्हणाले, “लोक आरोप केल्याशिवाय…”

 “ईडी ने नवाब मलिक यांना १५ मिनिटं दिली असती तर सर्व कागदपत्रे दिली असती. पण या प्रकरणात NIA आली पाहिजे असे प्रयत्न सुरू आहेत. कारण नवाब मलिक यांनी नार्कोटिकच्या विरोधात जी भूमिका घेतली. त्यातून महाराष्ट्रातील आणि देशातील काही लोकांचं पितळ उघडं पडलं आहे. हा माणूस आमच्या सरकारच्या विरोधी बोलतोय. याला अडचणीत आणलं पाहिजे. या भूमिकेमधून ही कारवाई सुरू आहे. हे प्रकरण दाऊद आणि दहशतवादी संघटनेपर्यंत पोहचून आपल्या सरकारमधील या मंत्र्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. शरद पवार यांच्याबद्दल ही असच केलं. पण काहीच निघालं नाही,” असं देखील जयंत पाटील म्हणाले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: While forming government we gave up the opportunity of the chief minister post says jayant patil kjp 91 hrc