पिंपरी- चिंचवडचा नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी रस्त्याला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं फ्लेक्स वॉर बघायला मिळत आहे. श्रेयवादाचे फ्लेक्स पुणे- नाशिक महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे आणि शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी हे फलक लावले आहेत. आमदार महेश लांडगे यांना आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार आहे. यात काही दुमत नाही. महाविकास आघाडीतून अजित गव्हाणे यांचं आव्हान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी रस्त्याला केंद्राने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. यावरून भोसरी विधानसभेत श्रेयवाद पाहायला मिळत आहे. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, हे वास्तव आहे. खासदार अमोल कोल्हे आणि भाजप आमदार महेश लांडगे या दोघांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केलेली होती. त्या भेटीचे फोटो फ्लेक्सवर पाहायला मिळतात. भाजप आमदार महेश लांडगे यांनी लावलेल्या फ्लेक्सजवळच शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी फ्लेक्स लावला आहे. गव्हाणे यांनी अमोल कोल्हे यांचे तर महेश लांडगे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. नाशिक फाटा ते खेडपर्यंत हे फलक लावण्यात आले आहेत. हेही वाचा - पशुधन योजनेतंर्गत लाभार्थ्याकडे लाच मागणारा पर्यवेक्षकाला पकडले; खेड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई हेही वाचा - प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा पुणे- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमधून सुटका व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे या रस्त्यासाठी पाठपुरावा केला जात होता. चाकण, भोसरी, येथील वाहतूक कोंडी सुटणार आहे. पक्ष कुठलाही असो, श्रेयवाद घेण्यापेक्षा हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवा.