पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी गुंड गजानन मारणे याची घेतलेली भेट, तसेच कल्याणमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकीय पक्षाचे नेते आणि गुंडांच्या संबंधावरून टीका होत असताना गुंड शरद मोहोळ याचा जवळचा साथीदार हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दाभेकर याने शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील निलायम चित्रपटागृहाजवळ असलेल्या उपहारागृहात टोळीयुद्धातून शरद मोहोळ, हेमंत दाभेकर आणि साथीदारांनी गणेश मारणे टोळीतील किशोर मारणेचा खून केला होता. याप्रकरणात मोहोळ, दाभेकरसह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर खून प्रकरणात त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. गेल्या महिन्यात ५ जानेवारी रोजी मोहोळचा कोथरुडमधील सुतारदरा परिसरात वर्चस्वाच्या वादातून गणेश मारणेच्या साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. मोहोळची पत्नी स्वाती हिने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मोहोळच्या खुनानंतर शहरात खळबळ उडाली होती. दाभेकर मोहोळचा जवळचा साथीदार आहे.

हेही वाचा – पुणे : जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा भागापुरतेच मर्यादित राहावे : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे विधान

खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. दाभेकर याने मुख्यमंत्र्यांच्या मुंबई निवासस्थानी वर्षा बंगल्यावर डाॅ. शिंदे यांची भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजमाध्यमात दाभेकर अणि डाॅ. शिंदे भेटीचे छायाचित्र प्रसारित झाले.

गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोहोळच्या पत्नीने भारतीय जनता पक्षाचे काम कोथरुड भागात सुरू केले होते. पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली. या भेटीवरुन अजित पवार यांनी जाहीरपणे पार्थ यांना खडे बोल सुनावले होते. त्यापाठोपाठ मोहोळचा जवळचा साथीदार दाभेकर याने वर्षा निवासस्थानी जाऊन खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्यानंतर समाजमाध्यमात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दाभेकरविरुद्ध खून, खंडणी, अपहरण असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – १२ जिल्ह्यांमधील चार कोटी जुनी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध

भेट घडविणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

मोहोळचा विश्वासू साथीदार दाभेकरने शिंदे यांच्याशी वर्षा निवासस्थानी भेट घडविण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गंभीर दखल घेण्यात आली. दाभेकरची शिंदे यांच्याशी भेट घडविणाऱ्या युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी अनिकेत जावळकर यांची हक्कालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is hemant dabhekar who met cm eknath shinde son shrikant shinde on varsha pune print news rbk 25 ssb
First published on: 05-02-2024 at 17:37 IST