पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सत्तावीसाव्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली आहे. दोनवेळा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे हे महापौरही बिनविरोध झाले आहेत. त्यांनी बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आहे.

रवि यांचा जन्म १५ ऑगस्ट १९८४ रोजी भोसरी येथे झाला. ४१ वर्षीय रवि हे हे ‘डी. फार्मसी’ पदवीधारक आहेत. त्यांना शेती, वाचन आणि खेळाची आवड आहे.

रवि यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे वडील कै. बाबासाहेब लांडगे यांनी जनसंघाच्या काळापासून शहरात भाजपचा पाया रचला. त्यांनी सन १९९२ मध्ये नगरसेवक व विरोधी पक्षनेतेपद भूषवले. त्यांचे चुलते कै. अंकुशराव लांडगे हे देखील १९९७ मध्ये नगरसेवक, विरोधी पक्षनेते आणि भाजपचे शहराध्यक्ष होते. २००७ मध्ये चुलत्यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी रवि लांडगे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. २०१५ मध्ये त्यांनी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून काम केले.

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग सहा धावडेवस्ती-भगतवस्ती मधून रवि लांडगे पहिल्यांदा बिनविरोध महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. मागील पंचवार्षिकमध्ये स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याने रवि नाराज झाले होते. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रवि यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. परंतु, भोसरी विधानसभेची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सुटली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून रवि पुन्हा स्वगृही भाजपमध्ये आले. पुन्हा प्रभाग सहा धावडेवस्ती मधून रवि लांडगे बिनविरोध निवडून आले. सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपने रवि यांना पहिल्या अडीच वर्षात महापौरपदाची संधी देऊन मागील पंचवार्षिकमध्ये झालेला अन्याय दूर केला. बिनविरोध निवडून आलेल्या रवि यांची महापौरपदीही बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे या देखील माजी नगरसेविका आहेत.

रवि लांडगे यांचे सामाजिक कार्य

भोसरी परिसरात त्यांनी केलेले सामाजिक कार्य लक्षणीय आहे. भोसरीतील २०० खाटांच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव त्यांनी जनआंदोलन उभारून यशस्वीपणे हाणून पाडला. बहुआयामी व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्य केवळ राजकारणच नव्हे तर विविध क्षेत्रांत त्यांचा दबदबा आहे.

आनंद ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान, शिव गणेश मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून ते अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत आहेत. नियुद्ध कराटे आणि मार्शल युद्ध संघाचे अध्यक्ष असून ते कराटे स्पर्धा, दिवाळी पहाट, होम मिनिस्टर कार्यक्रम आणि बैलगाडा शर्यतींचे प्रमुख आयोजन करतात.

दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि कै. अंकुशराव लांडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन ते करतात. प्रतिष्ठानामार्फत महिलांना शिवणकला, तांत्रिक उद्योजकता आणि पाककला कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य रवि लांडगे करतात.