पुणे : युरोपमध्ये अनेक देशांत छोटी राज्ये आहेत. छोटी राज्ये ही प्रशासनासाठी सोईची असतात. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाडा हे वेगळे राज्य व्हावे. कारण राज्यकर्ते या विभागापासून तब्बल सहाशे किलोमीटर दूर आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी हे वेगळे राज्य आवश्यक आहे, अशी भूमिका लेखक व विचारवंत डॉ. सूरज एंगडे यांनी मांडली.
मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने रविवारी (ता.१७) आयोजित मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात एंगडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिर्ला एरिक्सनचे माजी अध्यक्ष विवेकानंद भोसले, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. कार्यक्रमात मराठवाडाभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात औद्योगिक सुरक्षा संचालक देविदास गोरे यांना प्रशासकीय पुरस्कार, द प्राइड इंडियाचे (स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर) डॉ. रमाकांत जोशी यांना सामाजिक पुरस्कार, डॉ. बबन जोगदंड यांना शैक्षणिक पुरस्कार, उद्योजक अनिरुद्ध पावसकर यांना उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ॲड. जी. आर. देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.




आणखी वाचा-गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यभागात जड वाहनांना प्रवेश बंद
एंगडे म्हणाले, की मराठवाड्याचा विकास होत नाही, अशी चर्चा खूप काळापासून सुरू आहे. आपल्यावर राज्य करणारे मराठवाड्यापासून सहाशे किलोमीटर अंतरावर राहतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रात्रीच प्रवास सुरू करावा लागतो, त्या वेळी दुसऱ्या दिवशी आपण तिथे वेळेत पोहोचतो. याउलट युरोपात अनेक देशांत छोटी राज्ये आहेत. आपल्या काही जिल्ह्यांएवढी तिथे राज्ये आहेत. ही छोटी राज्ये सुव्यवस्थेसाठी अतिशय चांगली ठरतात. त्यामुळे मराठवाडा हेही वेगळे राज्य व्हावे.
मराठवाडा हे वेगळे राज्य केले, तर त्याच्या अर्थव्यवस्थेचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जातो. मराठवाड्यात नेमकी कशातून सधनता येईल, याचे संशोधन करावे लागेल. खनिजांसह इतर आर्थिक स्रोतांचा शोध घेता येईल. झारखंड हे राज्य केवळ खनिज उत्खननावरच चालू आहे. त्याप्रकारे आपल्याला संशोधन करून आर्थिक विकासाचे मार्ग शोधावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात वैभवशाली मराठवाडा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रास्ताविक समितीचे सचिव दत्ताजी मेहत्रे यांनी केले.
आणखी वाचा-पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव
धार्मिक राष्ट्रवादापासून दूर राहा
सध्या देशात सगळीकडे धार्मिक राष्ट्रवाद पसरला आहे. त्यापासून तरुणांनी दूर राहायला हवे. राष्ट्र हे त्यातील नागरिकांपासून बनते. नागरिकांच्या हिताचे वागणे हा राष्ट्रवाद असतो. आता एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात वागणे हा राष्ट्रवाद ठरत आहे. अशा धार्मिक राष्ट्रवादाला अजिबात थारा देऊ नये, असे आवाहन एंगडे यांनी केले.