शिरूर : शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथे विहिरीत मृतावस्थेत सापडलेले पाच महिन्यांचे बालक आणि महिलेच्या मृतदेहांबाबतचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह स्वत:च्या साडेचार महिन्यांच्या मुलाचा वडिलांनीच विहिरीत ढकलून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

रूपाली योगेश कुऱ्हाडे (वय २२) आणि मुलगा कार्तिक (दोघे रा. कवठे येमाई, ता. शिरूर. मूळ रा. हिरडपुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांचा खून झाला आहे. या प्रकरणी रूपालीचा पती योगेश संभाजी कुऱ्हाडे (वय २२) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत रूपालीचे वडील बंडू शामराव खवले (वय ४०, रा. गुळज ता. गेवराई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीला न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्टला अण्णापूर येथे एका शेतातील विहिरीमध्ये २५ ते ३० वर्षे वयाची महिला आणि एक बालक मृतावस्थेत आढळून आले होते. त्याबाबत घातपाताचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सुनील उगले यांचे पथक तयार करण्यात आले होते. पथकाला योगेश कुऱ्हाडे याच्याविषयीची माहिती मिळाली. योगेश पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातूनच त्याने पत्नीसह मुलाला संपविण्याचा कट रचला. त्यानुसार ६ ऑगस्टला आंघोळीच्या बहाण्याने त्याने दोघांना शेतातील विहिरीजवळ नेले. रूपाली मुलाला घेऊन विहिरीच्या कडेला उभी असताना त्याने दोघांना आत ढकलून दिले. पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला.