राष्ट्रवादीचे अनेक नेते हे बंड करून भाजपासोबत सत्तेत सामील झाले आहेत. त्यातील काही नेत्यांना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केल आहे. तीच परिस्थिती अजित पवार यांच्यावरदेखील येऊ शकते का? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी भाजपाला लोकनेते आवडत नाहीत. भाजपाने अनेक लोक नेत्यांना संपवल आहे. त्यामुळे भाजपाने वरपासून खालपर्यंत भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवायचे आहे, असं ठरवलं तर ते होऊ शकते, असे सूचक विधान केले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपासोबत गेलेले काही लोक कमळाच्या चिन्हावर लढतील, असे तुम्ही म्हणाले, तर अजित पवार हेदेखील कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, असं म्हणायचं आहे का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, भाजपाची प्रवृत्ती आणि विचारसरणी बघितली तर त्यांना कुठलाही लोकनेता आवडत नाही. भाजपमधील जे-जे लोकनेते होते, त्यांना भाजपाने संपवले आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, अडवाणी यांची आज काय परिस्थिती आहे ते बघा. जे लोकनेते आणखी आहेत त्यांनादेखील भाजपा हळूहळू संपवत आहे. भाजपाला केवळ लोकसभेचे पडलेले आहे, बाकी काही नाही. उद्या असं होऊ शकतं की भाजपाच्या वरिष्ठांनी ठरवलं वरपासून खालपर्यंत भाजपाच्या चिन्हावर लढायचं तर ते होऊ शकतं, असे सूचक विधान त्यांनी केले.




मी अजित पवारांना आदरयुक्त घाबरतो
अजित पवार यांच्याबरोबर अनेकांनी भाजपासोबत जाण्याची भूमिका घेतली. अजित पवार यांना मी त्यांच्या कामामुळे आदरयुक्त घाबरतो. पण केवळ विचार बदलण्यासाठी जर कोणी दमदाटी केली तर मी कुणाला घाबरत नाही. म्हणून आम्ही शरद पवार यांचा विचार घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत. शरद पवार यांचे एक मत आहे. भाजपाची खेळी होती. शिंदे गटाला फोडलं. शिंदे गट आणि ठाकरे गट वेगळा झाला. ते एकमेकांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले तेव्हा भाजपा एसीत बसून तमाशा बघत बसले. शरद पवार यांना ६० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. तीच खेळी भाजपा जर आमच्यावर टाकत असेल तर शरद पवार हेदेखील भाजपाचे बाप आहेत. भाजपाला जे पाहिजे होते ते शरद पवार यांनी दिले नाही. भाजपा हे कुटुंब, पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.