आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यातून पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी येत्या दोन दिवसांत निवडणुकांसदर्भात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. कलमाडी यांना काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आले असले तरी, पक्षाचे अधिकृत उमेदवार विश्वजित कदम यांना कलमाडींनी पाठींबा द्यावा यासाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी निवडणुकीत कशाप्रकारची भूमिका घ्यावी यासाठी सुरेश कलमाडी यांची आपल्या समर्थकांशी चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत कलमाडी आपली भूमिका स्पष्ट करतील. राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. तरीसुद्धा सुरेश कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणातील ताकद लक्षात घेता काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदमांच्या यांना पाठिंबा देण्यासाठी कलमाडींना विचारणा करण्यात आली असल्याचे समजत आहे. मात्र, यासंदर्भातील निर्णय हा आपल्या समर्थकांशी चर्चा करूनच घेणार असल्याचे कलमाडी यांनी सांगितले आहे.