पुणे : कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयचा स्वीकार दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे अनेक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. एआयचा स्वीकार वाढल्याने नोकऱ्या जातील, अशी भीती कायम व्यक्त केली जात आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचारी कपातीमागे एआय हे कारण असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्सिस्टन्ट सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी जगातील एआयची लाट आणि त्यामुळे होणारा परिणाम यावर भाष्य केले आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. देशपांडे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असोसिएशन ऑफ पुणे अर्थात ‘सीप’ या संस्थेच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ प्रा. डी. बी. पाठक यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी डॉ. देशपांडे बोलत होते. ‘पर्सिस्टन्ट सिस्टीम्स’चे संस्थापक दादा देशपांडे, ‘सीप’चे अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्ष शिवेश विश्वनाथन, सचिव विद्याधर पुरंदरे, खजिनदार आनंद रानडे आदी उपस्थित होते.

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘गेल्या २५ वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल होत गेले. दिवसेंदिवस त्यामध्ये चांगली प्रगती होत आहे. माहिती-तंत्रज्ञानामध्ये आलेली पहिली लाट ही कनेक्टिव्हिटीची, दुसरी लाट मंच आणि विविध प्रणाली यांची होती. सध्या आलेली लाट ही कृत्रिम प्रज्ञेची असल्याचे सांगताना कृत्रिम प्रज्ञेचे मंच मोठे असून, त्यामध्ये काम करण्यासाठी नव्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत व कामाची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे आगामी काळात भारताने यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम प्रगती होत आहे. देशाने भविष्यकाळाचा विचार करून कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली, तर त्याचा देशाच्या प्रगतीला निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो. सध्या असणारी कृत्रिम प्रज्ञेची लाट दीर्घकाळ राहणार आहे. त्यामुळे इथे काम करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना या तंत्राचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण या नव्या संधीचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.

‘सीप स्टार’ पुरस्कारांचे वितरण

या कार्यक्रमात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा ‘सीप स्टार’ पुरस्काराने गौरवही करण्यात आला. यामध्ये ऑपरेशनल एक्सलन्स विभागात ‘ऑल व्ह्यू सिस्टीम्स’, मेकिंग अ डिफरन्स इन पीपल प्रॅक्टिसेस विभागात ‘झोरिएंट’ व ‘आयसरटीज’, बेस्ट ईएसजी प्रॅक्टिसेस विभागात ‘ओपस’, बेस्ट टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन प्रॅक्टिसेस विभागात ‘इव्होलंट’ या संस्थांना, तर एक्सम्प्लरी वूमेन लीडर विभागात बेला खेर व दीप्ती देवरकोंडा यांना, तर टेक रोल मोडेल विभागात भूषण सालेर व अभिजित झीलपेलवार यांचा सन्मान करण्यात आला.